नाशिकरोड (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- भरधाव वेगाने अंगावर आलेल्या गणवेषधारी पोलीस कर्मचा-याला गाडी हळू चालवा असे सांगितल्याचा राग आल्याने संतापलेल्या गणवेषधारी पोलीस कर्मचाऱ्याने सायकलस्वार दिव्यांग प्रेस कर्मचाऱ्याला लाथाबुक्क्यांनी अमानुष मारहाण झाल्याचा प्रकार गुरुवारी (दि.३१) रात्री साडे आठ वाजेच्या दरम्यान जेलरोडला नवरंग कॉलनी कॉर्नरवर घडला. अगदी किरकोळ कारणावरून जेष्ठ कर्मचाऱ्याला मारहाण झाल्याच्या या प्रकारामुळे नागरिकांतून आश्चर्य व्यक्त केले जात आहे. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी या पोलीस कर्मचाऱ्यावर कठोर कारवाई करण्याची मागणीही करण्यात आली आहे.
पोलीस कर्मचाऱ्याच्या मारहाणीत जखमी झालेल्या प्रेस कामगाराचे नाव दत्तात्रेय गेणूजी डमाळे (वय ५९) रा नवरंग कॉलनी, मंजुळा मंगल कार्यालयासमोर, जेलरोड असे असून त्यांच्यावर पालिकेच्या बिटको रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दत्तात्रेय डमाळे हे दिव्यांग प्रेस कर्मचारी आहेत. गुरुवारी रात्री ते सायकलवरून मेडिकलमध्ये औषधे घेण्यासाठी जात होते. नवरंग कॉलनी कॉर्नरवर वेगाने आलेला दुचाकीस्वार पोलीस कर्मचारी त्यांच्या अंगावर आला. त्यामुळे घाबरलेल्या डमाळे यांनी गाडी हळू चालवा असे संबंधित पोलीस कर्मचाऱ्यास सांगितले. त्याचा राग आल्याने संबंधित पोलीस कर्मचा-याने त्याची दुचाकी भर रस्त्यात उभी करून दत्तात्रेय डमाळे यांना शिवीगाळ करून त्यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. या मारहाणीत डमाळे रस्त्यावर खाली पडले असतांही मारहाण झाल्याने त्यांना दुखापत झाली. आपण पोलीस असून माझे तू काही करू शकत नाही अशी धमकी देवून संबंधित पोलीस कर्मचारी निघून गेला. जखमी दत्तात्रेय डमाळे यांना त्यांच्या कुटुंबीयांनी पालिकेच्या बिटको रुग्णालयात दाखल केले. उपनगर पोलिसांनी जखमी दत्तात्रेय डमाळे यांचा जबाब नोंदविला असून आता या प्रकरणातील दोषी पोलीस कर्मचाऱ्यावर काय कारवाई होते याकडे सामान्य नागरिकांचे लक्ष लागून आहे.