नाशिक : वासननगर येथील पोलीस वसाहत भागात भरदिवसा झालेल्या एका घरफोडीत चोरट्यांनी सुमारे अडीच लाखाच्या ऐवजावर डल्ला मारला. त्यात ३० हजाराच्या रोकडसह सोन्याचांदीच्या दागिण्यांचा समावेश असून याप्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संजय रमेश जवरे (३६ रा.शिवलेख अपा.वासननगर) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. जवरे कुटूंबिय बुधवारी (दि.३०) आपआपल्या कामानिमित्त घराबाहेर पडले असता ही घटना घडली. भरदिवसा अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या बंद घराचा कडीकोयंडा तोडून लोखंडी कपाटातील लॉकरमध्ये ठेवलेल्या रोकडसह सोन्याचांदीचे दागिणे असा सुमारे २ लाख ५० हजाराच्या ऐवजावर डल्ला मारला. अधिक तपास उपनिरीक्षक उघडे करीत आहेत.