नाशिक – सिडकोतील कालिका पार्क भागात महिलेचा विनयभंग
नाशिक : दुचाकी आडवी लावून एकाने दुचाकीस्वार महिलेचा विनयभंग केल्याची घटना सिडकोतील कालिका पार्क भागात घडली. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आण्णा पाटील शाळा भागात राहणा-या पीडित महिलेने याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. सोमवारी (दि.२८) महिला मोपेड दुचाकीने आपल्या घराच्या दिशेने प्रवास करीत असतांना पाठीमागून पांढ-या रंगाच्या दुचाकीवर आलेल्या अज्ञात इसमाने हे कृत्य केले. मोपेडला दुचाकी आडवी लावून संशयिताने पीडितेस काही कळण्याच्या आत विनयभंग करून पोबारा केला. अधिक तपास उपनिरीक्षक हरसिंग पावरा करीत आहेत.
गोठ्यात बांधलेले दोन बैल चोरीला
नाशिक : शहरात भुरट्या चोरट्यांचा सुळसुळाट झाला असून पशूधनासह हाती लागेल ते चोरटे चोरून नेत आहेत. गेल्या मंगळवारी (दि.८) चोरट्यांनी गोठ्यात बांधलेले लाखाचे दोन बैल सोडून नेले असून ही घटना विजयनगर भागात घडली. याप्रकरणी देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पंकज रामदास कदम (रा.देवी मंदिरासमोर,रेस्ट कॅम्प रोड देवळाली कॅम्प) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. कदम यांची विजय करंजकर नगर भागात शेती आहे. मंगळवारी शेतातील पोल्ट्री फार्म नजीकच्या गोठ्यात बांधलेले सुमारे एक लाख रूपये किमतीचे बैल चोरट्यांनी पळवून नेले. तपास उपनिरीक्षक पाडवी करीत आहेत.