नाशिकरोड (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– तंबाखू खाण्यास न दिल्याच्या आणि सोबत मद्यपान करीत नाही म्हणून दोघा मित्रांनी केलेल्या मारहाणीत दुसरा मित्र जखमी झाल्याची घटना उपनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. नाशिक पुणे महामार्गावरील विजय ममता सिग्नलजवळ मंगळवारी रात्री साडे आठ वाजता ही मारहाण करण्यात आली. इंद्रजीत भालचंद्र जगताप (वय ३२) रा. साई कुटीर सोसायटी, डीजीपी नगर, उपनगर यांनी उपनगर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार विकी शांतीलाल वाळवे (वय ३१) रा. आंबेडकर वाडी आणि विकी कचरू जाधव (वय ३०) रा. रविशंकर मार्ग, डीजीपी नगर या दोघा संशयितांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी इंद्रजीत जगताप डॉमिनोज पिझ्झा शॉप समोरील पान टपरीवर तंबाखू घेण्यासाठी थांबले होते. त्या ठिकाणी त्यांच्या ओळखीचे दोघे संशयितांनी त्यांना तंबाखू न दिल्याच्या आणि सोबत मद्यपान करीत नाही या कारणावरून वाद निर्माण केला आणि फिर्यादीला शिवीगाळ करून मारहाण केला. विकी वाळवे याने रस्त्यात पडलेला दगड इंद्रजीत जगताप यांच्या पाठीमागून डोक्यात मारून दुखापत केली आणि दोघेही संशयित फरार झाले. पोलीस हवालदार शेजवळ या गुन्ह्याचा पुढील तपास करीत आहेत.