नाशिकरोड (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – आपला ज्यांच्याशी वाद आहे त्यांना आपल्या बातम्या पुरवित असल्याच्या संशयावरून चौघांच्या टोळक्याने नवनाथ पंडित (वय २६) रा. जयप्रकाश नगर, अश्विनी कॉलनी, सामनगावरोड या युवकावर तलवारीसारख्या प्राणघातक हत्याराने वार करून जखमी केले. ही घटना बुधवारी सायंकाळी साडे पाच वाजेच्या दरम्यान सामनगाव रोडवरील शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयाजवळ असलेल्या कॅन्टीन जवळ घडली.
विशाल पवार, बाळा पवार, प्रवीण महाडिक आणि अशोक जाधव या चौघा संशयितांच्या विरोधात नवनाथ पंडित या युवकाने नाशिकरोड पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल झाला आहे. मित्रांच्या समवेत नवनाथ पंडित चहा पिण्यासाठी पायी जात असतांना चौघे संशयित दुचाकीवरून आले. अशोक जाधव याने नवनाथ पंडित याच्याकडे बोट दर्शवताच उर्वरित तिघा संशयितांनी कुरापत काढली आणि बाळा पवार या संशयिताने सोबत आणलेल्या तलवारीसारख्या घातक हत्याराने नवनाथ पंडितच्या पोटावर मारण्यासाठी वार केला. परंतु पंडित याने वार डाव्या हाताने वाचविल्याने पुढील अनर्थ टळला. या हल्ल्यात त्याच्या डाव्या हाताच्या मनगटाला गंभीर दुखापत झाली. या हल्ल्यानंतर संशयित दुचाकीवरून फरार झाले. पोलीस हवालदार एस.व्ही चौधरी या गुन्ह्याचा पुढील तपास करीत आहेत.