साडेचार लाखाची घरफोडी
नाशिकः घराचा कडीकोयंडा तोडून अज्ञात चोरट्याने कपाटातील सोन्या चांदीचे दागिने व रोख रक्कम असा सुमारे साडेचार लाखाचा ऐवज चोरून नेल्याची घटना शनिवारी (दि.५)सातपुर कॉलनी परिसरात उघडकीस आली. या प्रकरणी साहेबराव चंदा नेमणार ( रा. आंबेडकर भाजी मार्केट जवळ, सातपूर कॉलनी) यांनी तक्रार दाखल केली आहे. गुरूवार ते शनिवार दरम्यान त्यांच्या घराचा कडीकोयंडा तोडून अज्ञात इसमाने बेडरूममधील लोखंडी कपाटातील ठेवलेल्या लॉकरच्या चावीने लॉकर उघडून त्यातील ४ लाख ४८ हजार ४८५ रुपयाचे सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम असा ऐवज चोरून नेल्याप्रकरणी सातपुर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस उपनिरिक्षक राठोड करीत आहेत.
…..
वृद्यांवन नगरला घरफोडी
नाशिकः बंद घराचा दरवाजा तोडून चोरट्यांनी कपाटातील ५५ हजाराची रोकड पळवल्याची घटना आडगाव परिसरातील वृंदावननगर येथे शनिवारी (दि.५) उघडकीस आली. याप्रकरणी सागर अनिल वैद्य (रा. वृंदावननगर, जत्रा – नांदुर लिंकरोड, आडगाव ) यांनी तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार वैद्य कुटुंबिय बाहेरगावी गेले असता शुक्रवारी मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी घराचा मुख्य दरवाजा तोडून कपाटातील ५५ हजाराची रोकड चोरून नेली. याप्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास सहाय निरिक्षक पाटील करत आहेत.
….
अंबड परिसरात दोन घरफोड्या
नाशिकः अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोन विविध ठिकाणी झालेल्या घरफोडीत लाखो रुपयांचा ऐवज अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार परिक्षित श्रीकांत बागडे ( ३७, रा. प्लॉट नंबर बी २७ रेनिसन्स सोसायटी, गोविंद नगर ) यांच्या एच ए एल कॉलनी लेखा नगर मधील आरोही ट्रेडर्स या दुकानाचे अज्ञात चोरट्यांनी लाकडी प्लायवुडची भिंत तोडून दुकानात प्रवेश करून ६५ हजार ७०० रुपये किमतीच्या विविध वुड ब्रॅन्ड मालाच्या बाटल्या चोरून नेल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास उपनिरीक्षक हरिसिंग पावरा करीत आहेत. तर दुसरी घटना ३ ते ४ जुन दरम्यान अंबड औद्योगिक वसाहत परिसरात घडली. येथील हॉटेल आंबासिन मधील उघड्या शेडमध्ये असलेले १लाख ३० हजार रुपये किंमतीचे साहित्य अज्ञात चोरट्यांनी चोरून नेले याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास उपनिरीक्षक कैलास सोनवणे करीत आहेत.