सिन्नरला अल्पवयीन मुलीचा विनयभंग; पोलिस स्थानकात गुन्हा दाखल
सिन्नर : शहरातील पाण्याच्या टाकीजवळील तळवाडी परिसरात साडेचौदा वर्षीय मुलीचा घरात घुसून विनयभंग करीत आईवडील व भावास शिवागीळ करुन दमदाटी केल्याची घटना रविवारी मध्यरात्री २ वाजेच्या सुमारास घडली. याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, पीडित मुलगी पाण्याच्या टाकीजवळ, तळवाडी येथे कुटूंबासह वास्तव्यास असून याच परिसरात राहणाऱ्या रोहित राजेंद्र बर्डे (१८) याने मध्यरात्री दोन वाजेच्या सुमारास पीडित मुलगी घराच्या पडवीत झोपलेली असताना तिच्याजवळ जाऊन तू मला खूप आवडते, माझ्यासोबत चल असे म्हणून पीडित मुलीचा विनयभंग करीत बळजबरी करण्याचा प्रयत्न केला. पीडित मुलीने आरडाओरड केली असता तिचे आईवडील व भाऊ यांनी रोहितला जाब विचारला असता त्याने पीडितेच्या भावाला हाताच्या चापटीने मारहाण केली तसेच आईवडीलांना शिवागाळ करुन दमदाटी केली. याप्रकरणी पीडित मुलीच्या फिर्यादीवरुन पोलिसांनी रोहित बर्डे याच्याविरोधात गुन्हा दाखल केला असून सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक धुमाळ पुढील तपास करत आहेत.
कीर्तांगळी येथे लग्न घरातून ६० हजार लांबवले
सिन्नर : तालुक्यातील कीर्तांगळी शिवारात एका लग्नघरातून ६० हजारांची रोकड लांबवल्याची घटना घडली आहे. शिवारातील गणू बाबाच्या मळ्यात राहणारे अंकित संजय चव्हाणके (२४) यांच्या बहिणीचे रविवारी गावातीलच लॉन्सवर लग्न होते. लग्नाला लागणारे सर्व साहित्य घरातच ठेवण्यात आल्याने व घरातील सदस्यांची व नातेवाईंकांची ये-जा असल्याने त्यांचा घराचा दरवाजा उघडाच होता. रात्री दोनच्या आधी कुणीतरी घरातील कपाटाच्या ड्रॉवरमधून ६० हजारांची रोकड घेवून पोबारा केला. चव्हाणके यांनी कपाटात पैसे तपासले असता पैसे चोरीला गेल्याचे उघड झाले. त्यांनी एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली. पोलिसांनी घटनास्थळी येत पंचानामा करुन अज्ञात चोरट्यांविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सुरु आहे.