देशी दारू विक्रेता जेरबंद
नाशिक : विनापरवाना देशी दारूचा साठा करून मद्यविक्री करणा-या एकास पोलीसांनी जेरबंद केले. हा प्रकार राजीवनगर झोपडपट्टीत उघडकीस आला. संशयीताच्या ताब्यातून सुमारे ३५ हजार रूपये किमतीचा मद्यसाठा हस्तगत करण्यात आला असून याप्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बाबासाहेब रंगनाथ वासुंबे (५६ रा.राजीवनगर वसाहत) असे अटक केलेल्या मद्यविक्रेत्याचे नाव आहे. संशयीताने कुठलाही परवाना नसतांना प्रिंस संत्रा आणि टँगो पंच नावाचा देशी दारूचा साठा आपल्या घरात करून ठेवला होता. राजीव नगर झोपडपट्टीत बेकायदा मद्यविक्री होत असल्याची माहिती मिळाल्याने ही कारवाई करण्यात आली. शुक्रवारी (दि.४) सायंकाळी पोलीसांनी सापळा लावला असता संशयीत परिसरातील वीज पुरवठा करणा-या इलेक्ट्रीक रोहित्र्याजवळ किरकोळ मद्यविक्री करतांना मिळून आला. पोलीस तपासात त्याच्या ताब्यात मद्यसाठा असल्याचे पुढे आले असून घर तपासणीत मिळालेल्या मद्यसाठा हस्तगत करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस कर्मचारी भगवान शिंदे यांनी दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास जमादार जाधव करीत आहेत.
….
द्वारका परिसरात एटीएम फोडण्याचा प्रयत्न
नाशिक : स्टेट बँक आॅफ इंडियाच्या द्वारका शाखेचे एटीएम चोरट्यांनी फोडण्याचा प्रयत्न केला. या घटनेत हातोड्याचा वापर करण्यात आल्याने मशिनचे नुकसान झाले असून याप्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अंकीत रविद्र त्रिवेदी (रा.सिरीन मिडोज,गंगापूररोड) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. त्रिवेदी स्टेट बँकेच्या द्वारका शाखेत कार्यरत आहे. गुरूवारी (दि.३) मध्यरात्री ही घटना घडली. बँकेच्या एटीएम बुथमध्ये हातोडा घेवून शिरलेल्या चोरट्याने एटीएम फोडण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यात यश आले नाही. या घटनेत हातोड्याचा वापर करण्यात आल्याने मशिनचे डिस्पेन्सर तुटल्याने सुमारे दहा हजार रूपयांचे नुकसान झाले आहे. ही घटना बुथमधील सीसीटिव्ही यंत्रणेत कैद झाली असून हातोडाधारी २० ते २५ वयोगटातील चोरट्याचा पोलीस शोध घेत आहेत. अधिक तपास हवालदार जाधव करीत आहेत.
……
नांदूरनाका भागात चोरटा जेरबंद
नाशिक : चोरीच्या उद्देशाने फिरणा-या चोरट्यास पोलीसांनी बेड्या ठोकल्या. गस्ती पथकास संशयास्पद हालचाली आढळून आल्याने त्यास जेरबंद करण्यात आले असून याप्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संभाजी विलास काळे (रा.शिवनगर,आनंदवली) असे संशयीताचे नाव आहे. आडगाव पोलीसांचे गस्ती पथक शुक्रवारी (दि.४) रात्री नांदूरनाका भागात गस्त घालत असतांना संशयीत जनार्दन मोबाईल शॉपी जवळ संशयास्पद मिळून आला. चोरीसारखा दखलपात्र गुन्हा करण्याच्या तयारीत तो होता. पोलीसांनी त्यास ताब्यात घेतले असून त्याच्यावर आडगाव,पंचवटी आणि सरकारवाडा पोलीस ठाण्यात गंभीर गुन्हे दाखल आहेत.
….