नाशिक : सीसीटिव्ही फुटेजमुळे दुचाकी चोर पोलीसांच्या हाती लागला आहे. या चोरांकडून सात स्प्लेंडर,दोन अॅक्टीव्हा आणि एक मोपेड अश्या सुमारे चार लाख ५५ हजार रूपये किमतीच्या दहा मोटारसायकली पोलिसांनी हस्तगत केल्या. ही कारवाई शहर गुन्हे शाखेच्या युनिट १ च्या पथकाने केली. त्यानंतर त्याला मुद्देमालासह भद्रकाली पोलीसांच्या स्वाधिन करण्यात आले आहे. या दुचाकी चोराच्या अटकेने शहरातील भद्रकाली,उपनगर,नाशिक रोड पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यांचा उलगडा झाला आहे. भागवत संजय सानप (२७ रा.गंगापूरगाव) असे संशयित दुचाकी चोरट्याचे नाव आहे.
गुन्हे शाखेचे अंमलदार प्रशांत मरकड यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे ही कारवाी करण्यात आली. ठक्कर बाजार परिसरात शुक्रवारी एक तरूण संशयास्पद फिरत असल्याची माहिती पोलीसांना मिळाली होती. वरिष्ठ निरीक्षक विजय ढमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने सापळा लावला असता दुचाकीवर आलेला संशयीत, भद्रकाली पोलीस ठाणे हद्दीतील दुचाकी चोरीच्या गुह्यात सीसीटिव्ही फुटेजमध्ये आढळून आलेला होता. पोलीसांना खात्री पटताच त्यास ताब्यात घेतले असता त्याने ताब्यातील असलेली दुचाकी चोरीची असल्याची कबुली दिली. पोलीस तपासात त्याने भद्रकाली, उपनगर, नाशिकरोड आणि कोनगाव जि.ठाणे पोलीस ठाणे हद्दीतून तब्बल दहा मोटारसायकली चोरल्याची कबुली दिली.