शिष्यवृत्तीच्या बहाण्याने पावणे तीन लाखास गंडा
नाशिक : शैक्षणीक शिष्यवृत्ती देण्याची बतावणी करून भामट्यांनी एका पालकास तब्बल पावणे तीन लाखास गंडविल्याचा प्रकार समोर आला आहे. ही रक्कम प्रोसेसिंग फीच्या नावाखाली आॅनलाईन लांबविण्यात आली असून याप्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रविंद्र श्रीकृष्ण पांडे (रा.उत्तमनगर,सिडको) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. गेल्या वर्षी जानेवारी महिन्यात पांडे यांच्याशी भामट्यांनी संपर्क साधला होता. सर्व शिक्षण सोल्युशनच्या माध्यमातून तुमच्या मुलांना एल.एल.पी कंपनीकडून शैक्षणीक शिष्यवृत्ती मिळणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. लाखो रूपयांची शिष्यवृत्ती असल्याचे भासवून भामट्यांनी एका लिंकच्या आधारे प्रोसेसिंग फीच्या नावाखाली तब्बल २ लाख ७२ हजार ५०० रूपये आॅनलाईन भरण्यास भाग पाडले. वेगवेगळ्या मोबाईल नंबर वरून यासाठी संपर्क साधण्यात आला. तसेच वेगवेगळया बँक खात्यात हे पैसे वर्ग करण्यात आले. मुलांना शैक्षणीक खर्चासाठी लाखों रूपये मिळणार असल्याने पांडे यांनी ही रक्कम वर्ग केली. वर्ष भराचा कालावधी उलटूनही शिष्यवृत्ती न मिळाल्याने व आपली फसवणुक झाल्याचे लक्षात आल्याने पांडे यांनी पोलीसात धाव घेतली असून अधिक तपास वरिष्ठ निरीक्षक श्रीपाद परोपकारी करीत आहेत.
…..