नाशिक : चोरीची मोटारसायकल खरेदी करणा-या तरूणास न्यायालयाने एक वर्षांचा कारावास आणि अडीच हजार रूपयांचा दंडाची शिक्षा ठोठावली आहे. अक्षय विजय बेंडकुळे (२२ रा.पेगलवाडी,त्र्यंबकेश्वर) असे शिक्षा सुनावण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. हा खटला अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी कोर्ट नं. ४ चे न्या.एम.एम.गादीया यांच्या कोर्टात चालला.
१० ऑगष्ट २०१९ रोजी संदिप सारंगधर वरखेडे (२६ रा.विरा अव्हेन्यू सोसा.ध्रुवनगर) यांनी दुचाकी चोरीची तक्रार पोलिस स्थानकात दिली होती. या तक्रारीत दुचाकी रात्री सोसायटीच्या पार्किंगमध्ये लावलेली असतांना चोरट्यांनी चोरून नेली होती. पोलीस तपासात ती बेंडकुळे याच्याकडे मिळून आली. सदर चोरीची मोटारसायकल त्याने मंगेश संजय मधे (२० रा.पिंपळगाव बहुला) व प्रदिप जगन्नाथ तुपे यांच्याकडून खरेदी केल्याची कबुली दिली. तसेच खरेदी केलेल्या मोटारसायकलचे कागदपत्रांची पडताळणी न करता वाहन खरेदी केल्याने याप्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात विक्रेत्यांसह खरेदीकरणा-यावर चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुह्याचा तपास तत्कालीन हवालदार पी.जी.भुमकर यांनी करून खरेदीदारास अटक केली व न्यायालयात पुराव्यानिशी दोषारोपपत्र सादर केले होते. सरकार तर्फे अॅड. फिरोज शेख यांनी काम पाहिले. न्यायालयाने फिर्यादी,साक्षीदार व पंच यांनी दिलेली साक्ष आणि तपासी अधिका-यांनी सादर केलेल्या परिस्थितीजन्य पुराव्यास अनुसरून दुचाकी खरेदी करणा-या अक्षय बेंडकुळे यास एक वर्ष सश्रम कारावास व अडीच हजार रूपये दंडाची शिक्षा सुनावली.