नगरसेवकाच्या संपर्क कार्यालयावर दगडफेक
नाशिक : पूर्व वैमनस्यातून नगरसेवकास शिवीगाळ करीत दुचाकीस्वार टोळक्याने संपर्क कार्यालयावर दगडफेक केल्याची घटना जेलरोड भागात घडली. याप्रकरणी दहा जणांच्या टोळक्याविरूध्द नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ऋषीकेश उर्फ तात्या चौधरी,सचिन डांगे,अमोल बोराडे,आदित्य बोराडे,निखील बोराडे (रा.सर्व बोराडे मळा,जेलरोड) व त्यांचे पाच अनोळखी साथीदार अशी दगडफेक करणा-या संशयीतांची नावे आहेत. याप्रकरणी सुनिल पोपट धोंगडे (रा.नांदूरगाव) यांनी तक्रार दाखल केली आहे. धोंगडे शुक्रवारी (दि.४) सायंकाळच्या सुमारास नगरसेवक विशाल संगमनेरे यांच्या कार्यालयात कामानिमित्त जात असतांना ही घटना घडली. गणेश व्यायामशाळा जवळील कन्हैय्या अपार्टमेंट मध्ये असलेल्या संपर्क कार्यालयात जात असतांना दुचाकीवर डबलसिट आलेल्या संशयीत टोळक्याने हा हल्ला केला. नगरसेवक संगमनेरे आपल्या कार्यालयात नसतांना संशयीतांनी त्यांना शिवीगाळ करीत त्यांच्या कार्यालयावर दगडफेक केली. तसेच कार्यालयास लावलेला अॅक्रेलीक बोर्ड टोळक्याने लाठ्या काठ्यांनी फोडून नुकसान केले. यावेळी संशयीतांनी संगमनेरे भेटला तर सोडणार नाही अशी धमकी देवून दहशत माजवत पोबारा केला. अधिक तपास उपनिरीक्षक माळी करीत आहेत.
…..