नाशिक : अंबड औद्योगीक वसाहतीतील नवनाथनगर भागात गुन्हे शाखेच्या युनिट २ च्या पथकाने गावठी कट्टा बाळगणा-या परप्रांतीयास गजाआड केले आहे. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निरजकुमार भुदेवसिंग भघेल उर्फ पाल (रा.करसुआ जि.अलीगढ,उत्तरप्रदेश) असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. युनिट २ चे कर्मचारी विजय वरंदळ यांना मिळालेल्या माहितीवरून ही कारवाई करण्यात आली. नवनाथनगर येथील दातीर मळा भागात राहणा-या परप्रांतीयाकडे गावठी कट्टा असल्याची माहिती पोलीसांना मिळाली होती. त्यानुसार युनिटचे निरीक्षक आनंदा वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा लावण्यात येवून संशयीतास बेड्या ठोकल्या असता त्याच्या अंगझडतीत गावठी कट्टा आणि एक जीवंत काडतुसे असा सुमारे ३० हजार ५०० रूपयाचा ऐवज मिळून आला. ही कारवाई सहाय्यक निरीक्षक वसंत खेतेले,उपनिरीक्षक पोपट कारवाळ,हवालदार संजय सानप,सोमनाथ शार्दुल संपत सानप,पोलीसनाईक विजय वरंदळ,प्रशांत वालझाडे,यादव डंबाळे आदींच्या पथकाने केली.