नाशिक : अल्पवयीन मुलीवर काचेच्या तुकड्याने वार केल्याचा प्रकार औद्योगीक वसाहतीतील पांजरापोळ भागात घडला आहे. याप्रकरणी चुंचाळे येथील घरकुल भागात राहणा-या मुलीच्या आईने तक्रार दिली आहे. या तक्रारीवरुन अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेत मुलगी जखमी झाली असून प्रविण नामक संशयिताने घरी सांगितल्यास कुटूंबियास जीवे मारण्याची धमकी दिल्याचे तक्रारीत म्हटले आहे. पीडित मुलगी आपल्या बिल्डींगच्या पाठीमागील पांजरापोळ भागात अन्य मैत्रीणीसमवेत खेळत असतांना ही घटना घडली. प्रविण नामक संशयिताने मुलीस गाठून काही एक कारण नसतांना तिला दमदाटी केली. यावेळी मुलीने आपल्या मम्मी पप्पाकडे तुझे नाव सांगेन असे म्हटल्याने ही घटना घडली. संतप्त संशयिताने जमिनीवर पडलेला काचेचा तुकडा उचलून मुलीच्या उजव्या हातावर वार केला. या घटनेत मुलगी जखमी झाली असून त्याने जातांना माझे नाव घरात सांगितले तर तुझ्या आई वडिलांनाही जीवे मारेन अशी धमकी दिली. अधिक तपास उपनिरीक्षक सोनवणे करीत आहेत.