नाशिक : महात्मानगर भागात ओव्हरटेक करणा-या कारला धडक दिल्याने दुचाकीस्वार ठार, एक जण जखमी
नाशिक : महात्मानगर भागात ओव्हरटेक करणा-या कारला धडक दिल्याने दुचाकीस्वार ठार झाला तर या अपघातात एक जण जखमी झाला. आयुष राजेंद्र वाघ (२३ रा.गणेशनगर,वरणगाव जि.जळगाव) असे अपघातात ठार झालेल्या बुलेटस्वाराचे नाव आहे. या अपघातात दुचाकीवर पाठीमागे बसलेला आर्य संदिप जोशी (१८ रा.जुने धुळे हल्ली मिरा अपा.शिवाजीनगर,सातपूर) हा युवक जखमी झाला आहे. या अपघातात दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. याप्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात कारचालकाविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जखमी संदीप जोशी यांनी या अपघाताची तक्रार दिली आहे. या तक्रारीत म्हटले आहे की, शनिवारी मित्र आयुष वाघ याच्या बुलेटवर (एमएच १९ डीआर २२६६) प्रवास करीत असतांना हा अपघात झाला. महात्मानगर रोडवरील सिक्स सिग्मा या हॉस्पिटल कडून एबीबी सिग्नलच्या दिशेनेबुलेटवर प्रवास करीत असतांना पाठीमागून भरधाव येणा-या फोरच्युनर कारने ओव्हरटेक करून अचानक जागेवरच वळण घेतले. त्यामुळे बुलेट कारवर आदळून हा अपघात झाला. या अपघातात दोघे मित्र जखमी झाले होते. त्यातील गंभीर आयुष वाघ याचा मृत्यू झाला असून अधिक तपास सहाय्यक निरीक्षक बैसाणे करीत आहेत.
सोन्याच पोत दुचाकीस्वारांनी ओरबाडून नेली
नाशिक – खुटवडनगर भागात रस्त्याने पायी जाणा-या दोन महिलांपैकी एकाच्या गळयातील सोन्याच पोत दुचाकीस्वारांनी ओरबाडून नेल्याची घटना घडली. शर्मिला सिताराम पोटे (रा.पुरूषोत्तम पार्क,वावरेनगर) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीवरुन अंबड पोलीस ठाण्यात जबरीचोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोटे व त्यांची मैत्रीण रविवारी (दि.२०) सायंकाळच्या सुमारास शतपावलीसाठी घराबाहेर पडल्या होत्या. परिसरात फेरफटका मारून दोघी मैत्रीणी सप्तस्वरलक्ष्मी बिल्डींग समोरून पायी जात असतांना ही घटना घडली. पाठीमागून पायी आलेल्या तरूणाने पोटे यांच्या गळ्यातील सुमारे ६० हजार रूपये किमतीची पोत बळजबरीने हिसकावून अॅक्टीव्हाने आलेल्या साथीदारासमवेत पोबारा केला. अधिक तपास उपनिरीक्षक पावरा करीत आहेत.