नाशिक : भागीदारी व्यवसाय थाटून पार्टनरला कोटयावधींचा गंडा घालणा-या निफाड येथील रेणुका मिल्कच्या दोघा संचालकांना सरकारवाडा पोलीसांनी अखेर बेड्या ठोकल्या. कोर्टाच्या आदेशाने दाखल झालेल्या या गुह्यात अटकपूर्व अर्ज फेटाळूनही गेल्या अनेक महिन्यांपासून ते पोलीसांना गुंगारा देत होते. संशयीतांना नैताळे ता. निफाड येथे जेरबंद करण्यात आले असून, न्यायालयाने त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
परशराम निवृत्ती पवार (४० रा.रामपूर आंबेवाडी – नैताळे ता.निफाड) व विलास गंगाधर गुंजाळ (४० रा.जळगाव – काथरगाव ता.निफाड) अशी भागीदारास ठकविणा-या संशयीतांची नावे आहेत. याप्रकरणी संदिप दत्तात्रेय आहेर (रा.पाथर्डी फाटा) यांनी तक्रार दाखल केली आहे. मिल्क ट्रेंडिग व्यावसायीक आहेर यांचा दूध संघाच्या माध्यमातून सन.२०११ मध्ये विलास गुंजाळ यांच्याशी मैत्री झाली होती. यावेळी जोडधंद्याच्या संकल्पनेतून रेणूका मिल्क प्लॉन्टची स्थापना करण्यात आली. आहेर यांनी गुंतवणुकीची हमी घेतल्याने ८० टक्के त्यांचा तर दोघा भागीदारांना प्रत्येकी दहा टक्के हिस्सा देण्याचे ठरले.त्यानंतर २०१२ मध्ये भागीदारी पत्रात बदल करण्यात आले.या भागीदारीत ४० टक्के आहेर यांना तर प्रत्येकी दोघांना ३० टक्के हिस्सा देण्याचे ठरले. यानंतर या व्यवसायासाठी संशयीत परशराम पवार यांच्या पत्नीच्या नावे रामपुर ता.निफाड येथे जमिन खरेदी करण्यात आली. या ठिकाणी मिल्क प्लान्ट सुरू करण्यासाठी आहेर यांनी सिडकोतील महानगर बँक तसेच राजाराम वराळ आणि बाळासाहेब थोरात यांच्या माध्यमातून लाखोंची रोकड उभी केली. त्याबरोबरच खेळत्या भांडवलासाठी सदर प्लान्टवर दीड कोटींचे कर्ज काढण्यात आले. दोघा संशयीतांकडे हा व्यवसाय सांभाळण्याची जबाबदारी असल्याने त्यांनी अल्पावधीतच तोटा झाल्याचे भासवून गैरव्यवहार केला. ही बाब लक्षात आल्याने आहेर यांनी दप्तर तपासणी केली असता संशयीतांनी १ कोटी ६५ लाख ५ हजार १८७ रूपयांचा गैरव्यवहार करून जमिनी घेतल्याचे पुढे आले. संशयीतांची कानउघडनी करताच त्यांनी वरिल रकमेचा अपहार केल्याचा लेखी कबुली जबाब दिला. तसेच वराळ आणि थोरात यांच्याकडून घेतलेल्या हात उसनवारीच्या रकमा आम्ही परत करू असे आश्वासन दिले. यानंतर संबधीतांनी मोठया रकमांची सहा महिन्यात परतफेड करणे शक्य नसल्याचे सांगून हा प्लॉन्ट आम्हाला विकत द्या त्याच्यावर कर्ज काढून तुमच्यासह हात ऊसनवार घेतलेले पैसे परत करण्याची ग्वाही दिली. त्यानुसार ३ जून २०१६ रोजी नव्याने भागीदार संस्थेत आपले नातेवाईक नवीन सदस्य म्हणून घेतले. या काळात संस्थेच्या गैरव्यवहारास आहेर जबाबदार असल्याचे भासवून संशयीतांनी नातेवाईकांना कायदेशीर नोटीसा पाठविण्यास भाग पाडले. यानंतर मात्र संशयीतांनी जीवे मारण्याची धमकी देत गुंतवणुकीची रक्कम अदा करण्यास टाळाटाळ केल्याने आहेर यांनी न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयाच्या आदेशान्वये सरकारवाडा पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान या गुह्यात अटक टाळण्यासाठी संशयीतांनी जिल्हा न्यायालयासह उच्चन्यायालयात अटकपूर्व अर्ज दाखल केला होता. दोन्ही ठिकाणी सुनावणीअंती अर्ज फेटाळण्यात आल्याने संशयीत पसार झाले होते. गेल्या दोन महिन्यांपासून ते पोलीसांना गुंगारा देत होते. नैताळे ता.निफाड येथे दोघांना बेड्या ठोकण्यात आल्या असून, त्यांना न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. शनिवारी (दि.५) संशयीताच्या कोठडीची मुदत संपणार असल्याने त्यांना पुन्हा न्यायालयात हजर केले जाणार आहे.