नाशिक – आंघोळीसाठी काढलेल्या गरम पाण्याच्या बादलीवर चक्कर येवून पडल्याने गंभीर भाजलेल्या महिलेचा मृत्यू
नाशिक : विहीतगाव येथे आंघोळीसाठी काढलेल्या गरम पाण्याच्या बादलीवर चक्कर येवून पडल्याने गंभीर भाजलेल्या महिलेचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. पुजा सुनिल जाचक (२८ रा.बागुलनगर,विहीतगाव) असे भाजल्याने मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुजा जाचक यांनी रविवारी सकाळी आंघोळीसाठी बादलीत गरम पाणी काढले असता ही घटना घडली होती. अचानक चक्कर आल्याने त्या पाण्याच्या बादलीवर पडल्या होत्या. या घटनेत त्या गंभीर भाजल्याने कुटूंबियांनी त्यांना तातडीने सिन्नर फाटा येथील साई केअर हॉस्पिल येथे दाखल केले असता उपचार सुरू असतांना त्यांचा मृत्यू झाला. अधिक तपास हवालदार दराडे करीत आहेत.
युवकाने गळफास लावून केली आत्महत्या
नाशिक : सिडकोतील महाराणा प्रताप चौकात राहणा-या २७ वर्षीय युवकाने गळफास लावून घेत आत्महत्या केली. सदर तरूणाच्या आत्महत्येचे कारण स्पष्ट होवू शकले नाही. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. अजिंक्य भारत पगारे (रा.रत्नप्रभा रो हाऊस,महाले फार्म) असे मृत युवकाचे नाव आहे. अजिंक्य पगारे याने रविवारी (दि.२०) अज्ञात कारणातून आपल्या बेडरूममधील पंख्यास ओढणी बांधून गळफास लावून घेतला होता. ही बाब निदर्शनास येताच कुटूंबियांनी त्यास तात्काळ जिल्हारूग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय सुत्रांनी मृत घोषीत केले. अधिक तपास जमादार राऊत करीत आहेत.
जिन्यावरून पाय घसरून पडल्याने महिलेचा मृत्यू
नाशिक : जिन्यावरून पाय घसरून पडल्याने ३८ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. ही घटना औद्योगीक वसाहतीतील अशोक नगर भागात घडली. याप्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. छाया नरेंद्र गवळे (रा.गोपाल विहार,प्रगती शाळेजवळ) असे मृत महिलेचे नाव आहे. गवळे या रविवारी (दि.२०) आपल्या राहत्या घरातील जिन्यावर पाय घसरून पडल्या होत्या. या घटनेत त्यांच्या डोक्यास गंभीर दुखापत झाल्याने कुटूंबियांनी त्यांना तात्काळ जिल्हा रूग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय सुत्रांनी मृत घोषीत केले. अधिक तपास पोलीस नाईक वाघमारे करीत आहेत.