नाशिक – अवघ्या नऊ दिवसात खूनाच्या प्रकरणात आरोपीला गजाआड करण्यात नाशिक ग्रामीण पोलिसांना यश आले आहे. पोलिसांनी मोठ्या शिताफीने संजय भोर यास जाळयात पकडले आहे. पाडळी शिवारात अनैतिक प्रेमसंबधातून घोटी येथील महावीर कुबेर मोदी (५३ ) यांची हत्या करण्यात आली होती.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महावीर कुबेर मोदी यांची मुलगी व संशयित संजय भोर (२४, धंदा-मजुरी, रा. गोंदे दुमाला, ता. इगतपुरी, जि. नाशिक) एक वर्षापासून प्रेमसंबंध होते. याबाबत मुलीचे वडिल महावीर मोदी यांना समजले होते. या अनैतिक प्रेमसंबधास त्यांचा विरोध होता. याचा राग मनात धरून संशयिताने १० मार्च रोजी रात्री १२:३० वाजेच्या सुमारास आरोपी मोटारसायकलवर मोदी यांच्या राहत्या घरी गेला. संशयिताने मोदी यांना आपल्या मोटारसायकलवर बसवले. त्यांना घेऊन मुंबई आग्रा रोडवरील पाडळी शिवारात उंड ओहळ पुलावर तो पोहोचला. मोदी यांच्या कानाच्या मागील बाजूस काचेच्या बाटलीने वार करून त्यांना खाली पाडले. नंतर त्यांच्या डोक्यात दगड टाकला. मोदी यांना पुलावरून खाली फेकून संशयित फरार झाला होता.
त्यानंतर पोलिसांना कुजलेल्या अवस्थेत मिळालेला एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळला. पोलीस अधिक्षक सचिन पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन तपासासाठी पोलिसांना मार्गदर्शन केले. त्यांच्या मार्गदर्शनानुसार पोलिसांनी संशयिताचा शोध घेण्यास सुरुवात केली. याबाबत कुठलेही पुरावे हाती नसताना पोलिसांनी फिर्यादी व इतर साक्षीदारांच्या मोबाईलच्या सीडीआरच्या विश्लेषणातून हा गुन्हा उघडकीस आणला. पोलिसांनी मोठ्या शिताफीने संजय भोर यास अटक केली. त्याची सखोल चौकशी केली असता त्याने हा गुन्हा केल्याची कबुली दिली आहे. अप्पर पोलीस अधीक्षक माधुरी कांगणे, उपविभागीय पोलीस अधिकारी, कविता फडतरे यांनी तपासात सहभाग घेतला.