नाशिक – स्मार्टरोडवर गुजरात पासिंगच्या वाहनातून सीएनजी लिकेज झाल्याची घटना
नाशिक – त्र्यंबकनाका ते अशोकस्तंभ या स्मार्टरोडवर गुजरात पासिंगच्या वाहनातून सीएनजी लिकेज झाल्याची घटना घडली. त्यामुळे वाहनांच्या मोठ्या रांगा सीबीएस सिग्नलपर्यंत लागलेल्या होत्या. या घटनास्थळी शहर पोलीस दाखल झाल्यानंतर सीबीएसकडून अशोक स्तंभाकडे जाणारी वाहतूक वळविण्यात आली. घटनास्थळी अग्निशमन विभागाचे जवान पोहचले. नागरिकांनी गर्दी न करता सहकार्य करावे असे आवाहन पोलिसांकडून यावेळी करण्यात आले. सीबीएस परिसरातील सिग्नलवर पोलीस गाडी आडवी करून पोलिसांनी रस्ता बंद केला. त्यानंतर या परिसरात जाण्यासाठी प्रतिबंध करण्यात आला होता. जिल्ह्यातील सिन्नरमध्ये दोन वाहनांमधून गॅस लिकेज झाल्यामुळे एका घटनेत चालकाचा होरपळून मृत्यू झाला होता. तर दुसऱ्या घटनेत होंडा सिटी गाडी जळून खाक झाली होती.
जून्या भांडणातून तिघांनी एकाला कोयता आणि लाकडी दांडक्याने मारहाण
नाशिक – जून्या भांडणातून तिघांनी एकाला कोयता आणि लाकडी दांडक्याने मारहाण करुन त्याच्या खिशातील दीड हजार रुपये लुटले. विहीतगाव येथील वालदेवी पूलावर ही घटना घडली. प्रशांत बायस, आकाश इंगळे, छकुल्या अशी संशयितांची नावे आहे. गुरुवारी रात्री साडे दहाच्या सुमारास रोशन पोपट सोनवणे (वय २०, माउलीनगर, बेलतगव्हाण मूळ रोकडोबावाडी) हा जात असतांना तिघांनी त्याला अडवून कुरापत काढून आकाश इंगळे याने लाकडी दांडक्याने मारहाण केली. तर छकुल्या नावाच्या एकाने त्याच्या खिशातील दिड हजार रुपये काढून घेतले. नाशिक रोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.