नाशिक : भरधाव दुचाकीचे टायर फुटल्याने ५४ वर्षीय महिलेचा अपघातात मृत्यू झाला. गिरणीतून दळण दळून घराकडे ही महिला परत येत होती. त्याचवेळेस दुचाकीचे टायर फुटले. त्यात ही महिला गंभीर जखमी झाली होती. भारती युवराज भांबरे (रा.समृध्दनगर,सातपूर) असे मृत महिलेचे नाव आहे. भारती भांबरे या गुरूवारी दुपारच्या सुमारास दळण दळण्यासाठी परिसरातील गिरणीत गेल्या होत्या. दळण दळून भारती या आपल्या स्कुटीवरून घराकडे परतत असतांना ही दुर्घटना घडली. जाधव संकुल येथील लाहोटीनगर भागातून त्या प्रवास करीत असतांना सम्राट मेन्स पार्लर समोर अचान भरधाव दुचाकीचे टायर फुटल्याने त्या रस्त्यावर पडल्या होत्या. या घटनेत त्यांच्या डोक्यास वर्मी मार लागल्याने त्यांना तातडीने मुंबईनाका येथील सोपान हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असतांना त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. अधिक तपास पोलीस नाईक आहेर करीत आहेत.