नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या सिन्नर येथील फार्महाऊसवर एलईडी टीव्ही चोरणार्याला तीन जणांना पोलिसांनी गजाआड केले आहे. या चोरांनी अनेक ठिकाणी घरफोड्या व दुचाकी चोरल्याचेही समोर आले आहे. या चोरांकडून सहा तोळे सोन्याचे दागिने, ४०० ग्रॅम चांदीचे दागिने, सहा रिव्हॉल्व्हर असा एकूण चार लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. गुन्हे शोध पथकाला मिळालेल्या माहितीनंतर या चोरांना शिताफीने अटक करण्यात आली.
घरफोडीतील सराईत आरोपी अर्जुन गोरख धोत्रे (रा. सिन्नर) त्याच्या पत्नीला भेटण्यासाठी जेलरोड येथे येत असल्याची माहिती समजल्यानंतर पहिले त्याला ताब्यात घेण्यात आले. त्यानंतर पोलिसांनी पोलिसी खाक्या दाखवल्यानंतर धोत्रे याने साथीदार आदित्य दशरथ शिंदे (रा. डुबेरे, सिन्नर) व करण प्रकाश घुगे (रा. सिन्नर) यांची नावे सांगितली. त्यानंतर त्यांनाही नाशिक गुन्हे शोध पथकाने ताब्यात घेतले. त्यांनी नाशिकरोड येथील भागात त्याचबरोबर आडगाव पोलीस स्टेशन हद्दीत नांदूर नाका येथे बंदुकीचे दुकान फोडले असून इंदिरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतही दुकान फोडले आहे. त्याचबरोबर शहरातून दोन मोटारसायकल एकाच अपार्टमेंट मधून चोरल्याची कबुली दिली. त्याचबरोबर कॅबिनेट मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या सिन्नर येथील फार्महाऊसमध्ये झालेले घरफोडीचा प्रकार देखील उघडकीस आला आहे. हे तिन्ही आरोपी सराईत असून त्यांच्यावर नाशिक जिल्ह्यासह विविध राज्यांमध्ये चोरीचे गुन्हे दाखल आहेत.