नाशिक :- वन्य प्राण्यांच्या शिकारीसाठी लपून बसलेल्या चार जणांना वनविभागाच्या पथकाने अटक केली आहे. या चौघांची वन विभागाच्या पथकाने ताब्यात घेऊन तपासणी केली असता त्यांच्याकडे दोन कोयते, एक विळा, ३१ काठ्या, दोन मोटारसायकली आणि ८ वाघरी आदी साहित्य मिळाले आहे. त्यांच्या विरोधात वनविभाग कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत समजेलली माहिती अशी की, नाशिक त्र्यंबक रस्त्यावर असलेल्या आडोळी येथील कक्ष क्रमांक ५२० च्या जवळ गस्त घालत असताना वनविभागाच्या पथकाला काही संशयित लपून बसल्याचे आढळून आले. त्यानंतर या पथकाने या ठिकाणी पाहणी सुरू केली असता या ठिकाणी लपून बसलेले तुकाराम दिवे, हरी तानाजी जाधव, काळूबाळू बेंडकोळी, विष्णू सोनू शिंदे असे चार जण लपून बसल्याचे आढळून आले. त्यांना ताब्यात घेतल्यानंतर त्यांच्याकडे शिकारीचे साहित्य सापडले. ही कारवाई उपवनसंरक्षक पंकज गर्ग, सहाय्यक वनसंरक्षक गणेश झोळे, यांच्या मार्गदर्शनाखाली विवेक भदाने व त्यांच्या पथकाने केली आहे.