नाशिक : ग्राहकाने गल्यातील २० हजाराच्या रोकडवर डल्ला मारल्याची घटना रविवार पेठेत घडली. पीव्हीसी टी घेण्याच्या बहाण्याने दुकानात ग्राहक गेल्यानंतर त्याने ही चोरी केली. संजय रतनलाल सामसुका (रा.गाडगीळ लेन,रविवार पेठ) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. सामसुका यांचे गाडगीळ लेन येथे हार्डवेअरचे दुकान आहे. सोमवारी (दि.११) ते दुकानात असतांना एक अनोळखी इसम पीव्हीसी टी खरेदी करण्यासाठी आला होता. सामसुका हे टी काढण्यासाठी दुकानाच्या पाठीमागील खोलीत गेले असता ही घटना घडली. अज्ञात चोरट्या ग्राहकाने दुकानात शिरून कपाटातील गल्यात २० हजार रूपये असलेली बॅग चोरून नेली. याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास हवालदार चव्हाण करीत आहेत.









