लिंबू फेकल्याच्या कारणातून शेजा-यांमध्ये हाणामारी
नाशिक : भारावलेले लिंबू फेकल्याच्या अंधश्रद्धेतून शेजा-यांमध्ये तुंबळ हाणामारी झाल्याची घटना वडाळागावात घडली. याप्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात परस्पर विरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
अफसर अन्सा शहा (रा.केबीएच शाळेसमोर) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, गेल्या बुधवारी (दि.२) शेजारी राहणारे अल्ताफ शहा यांच्या घरातून अफसर शहा यांच्या दारात लिंबू फेकण्यात आला होता. याबाबत वडिल अन्सार शहा यांनी शेजा-यांना विचारणा केली असता संशयीत अल्ताफ शहा, अख्तर उर्फ विकी शहा, जावेद शेरू बशीर शहा व गुलाब रज्जा आयु शहा आदींनी शिवीगाळ व जीवे मारण्याची धमकी देत तक्रारदार, वडिल व भाऊ निसार यांना लोखंडी रॉडने बेदम मारहाण केली. या घटनेत बापलेक जखमी झाले आहेत. तर मेहजबी अख्तर हुसेन या महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार लिंबू फेकल्याचा जाब विचारण्यासाठी आलेल्या अन्सार शहा, निसार शहा व अफसर शहा आदींनी महिलेसह पती अख्तर व मुलास धारदार शस्त्र आणि लोखंडी रॉडने मारहाण केल्याचे म्हटले आहे. अधिक तपास हवालदार कोकाटे व पोलीस नाईक बरेलीकर करीत आहेत.
….