नाशिक – रस्त्याने पायी जाणा-या महिलेचा विनयभंग; पोलिस स्थानकात गुन्हा दाखल
नाशिक : उंटवाडी भागात मैत्रीणीच्या घराकडे रस्त्याने पायी जाणा-या महिलेचा एकाने विनयभंग केला. याप्रकरणी मुंबईनाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून या संशयिताला अटक करण्यात आली आहे. सौरभ राजू सोनवणे (१९ रा.दत्तनिवास,अंबड लिंकरोड) असे संशयीताचे नाव आहे. पीडित महिला सोमवारी सायंकाळच्या सुमारास मैत्रीणीचा फोन आल्याने तिच्या घरी पायी जात असतांना ही घटना घडली. उंटवाडीरोडवरील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या नवीन इमारतीसमोरून महिला पायी जात असतांना संशयीताने पाठलाग करून शिवीगाळ करीत तिचा विनयभंग केला. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक मन्सूरी करीत आहेत.
…..
सोन्याची पोत ओरबाडून नेली
नाशिक : महामार्गावरील बळीमंदिर भागात घराजवळ फेरफटका मारीत असतांना दुचाकीवरून आलेल्या भामट्यांनी वृध्देच्या गळय़ातील सोन्याची पोत ओरबाडून नेली. याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात जबरीचोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रत्नमाला दयाराम कराटे (६१ रा.वृंदावन कॉलनी,बळी मंदिरापाठीमागे) यांनी तक्रार दाखल केली आहे. कराटे या सोमवारी (दि.१४) दुपारच्या सुमारास घराजवळील परिसरात फेरफटका मारीत असतांना ही घटना घडली. शिंदे फार्म रोडवरील प्रतिक्षा बंगल्यासमोरून त्या पायी जात असतांना दुचाकीवर आलेल्या भामट्यांपैकी एकाने खाली उतरून त्यांच्या गळयातील सुमारे ७० हजाराची पोत ओरबाडून घेत पोबारा केला. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक पवार करीत आहेत.