नाशिक – पोलिस कर्मचाऱ्यास मारहाण केल्याप्रकरणी न्यायालयाने एका युवकास एक वर्ष सश्रम कारावास व दोन हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. ट्रिपल सीट येऊन रस्त्याच्या मधोमध दुचाकी लावल्याने वाहतूकीस अडथळा होतो म्हणून पोलिसांनी हटकल्यानंतर या युवाकाने मारहणा केली होती. गणेश बाबुराव फफाळे (वय २७, रा. रुम क्र. ३६५, म्हाडा कॉलनी, विडी कामगार नगर, अमृतधाम) असे या युवकाचे नाव आहे. जिल्हा व सत्र न्यायालयाचे (क्रमांक ८) न्यायाधीश एम.ए. शिंदे यांनी हा निकाल दिला. सरकारतर्फे सहायक अभियोक्ता आर.वाय. सूर्यवंशी यांनी पुरावा सादर करत युक्तीवाद केला. हवालदार एम.एम. पिंगळे, श्रीमती एम.एस. सांगळे यांनी पैरवी केली. अभियोग कक्षाने दिलेल्या माहितीनुसार, मेरी लिंक रोडवर असलेल्या मंडलिक सर्व्हिस स्टेशनसमोर ५ अॉगस्ट २०१८ रोजी रात्री ८.३० वाजता ही घटना घडली होती. पंचवटी ठाण्याचे पोलिस नाईक रफीक रजा मुनीर शेख (बक्कल क्र. २७९) हे साईनाथनगर परिसरात वाहतूकीचे नियमन करत होते. तेव्हा आरोपी गणेश बाबुराव फफाळे हा दोन साथीदारांसह मोटारसायकलवर ट्रिपल सीट आला रस्त्याच्या मधोमध थांबला. त्यामुळे वाहतूक खोळंबली. शेख यांनी आरोपीस निघून जाण्यास सांगितलं असता त्याचा राग आला. शेख यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करून खाली पाडले. गणवेशाच्या शर्टाची दोन बटने तसेच खांद्यावरील फीत ओढून तोडली. याप्रकरणी सरकारी कामकाजात अडथळा आणल्याप्रकरणी पंचवटी पोलिस ठाण्यात भादंवि कायदा कलम ३५३, ३३२, १८६, ३४, मोटार वाहन कायदा कलम १२८/१७७ अन्वये गुन्हा (रजिस्टर क्रमांक ३१७/२०१८) नोंदवला होता. न्यायालयाने सुनावणीअंती आरोपीस भादंवि कायदा कलम ३३२, ३४ अन्वये एक वर्ष सश्रम कारावास व दोन हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली.