नाशिक : औद्योगीक वसाहतीतील श्रमिकनगर येथे चाकूचा धाक दाखवित मारहाण करून तरूणाचा मोबाईल दोघा भामट्यांनी लंपास केला. याप्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात जबरीचोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून दोघा संशयीतांना अटक करण्यात आली आहे. सिध्दार्थ चंद्रकांत जाधव (रा.फुलेनगर) व हर्षल सुनिल कोयटे (रा.गोपालपार्क,श्रमिकनगर) अशी अटक करण्यात आलेल्या संशयीतांची नावे आहे. याप्रकरणी देवेंद्र सुखारी रॉय (२० रा. हिंदी शाळेजवळ,श्रमिकनगर) या परप्रांतीय तरूणाने तक्रार दाखल केली आहे. रॉय शुक्रवारी (दि.११) दुपारच्या सुमारास आपल्या रूममध्ये झोपलेला असतांना ही घटना घडली. रूमचा दरवाजा वाजविण्यात आल्याने रॉय याने आपल्या घराचा दरवाजा उघडला असता दोघा संशयीतांनी घरात प्रवेश केला. यावेळी चाकूचा धाक दाखवित संशयीतांनी त्यास लाथाबुक्यांनी मारहाण केली. यावेळी अथरूंगावर पडलेला त्याचा सुमारे दहा हजार रूपये किमतीचा मोबाईल भामट्यांनी हिसकावून पोबारा केला. तक्रार दाखल होताच पोलीसांनी भामट्यांना हुडकून काढले असून अधिक तपास उपनिरीक्षक जाधव करीत आहेत.