नाशिक : जेलरोड भागात डोळय़ात मिरचीपुड फेकत दुचाकीस्वारास बेदम मारहाण; पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
नाशिक : जेलरोड भागात डोळय़ात मिरचीपुड फेकत दुचाकीस्वारास बेदम मारहाण करण्यात आली आहे. मयुर मरकड (रा.गोरेवाडी,ना.रोड) असे दुचाकीस्वारास मारहाण करणा-या संशयीताचे नाव आहे. याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेत दुचाकीस्वार जखमी झाला असून, त्याच्या मोटारसायकलचेही मोठे नुकसान झाले आहे. याप्रकरणी निलेश नरेंद्रभाई चौधरी (रा.नेहरूनगर,जेलरोड) यांनी तक्रार दाखल केली आहे. चौधरी गेल्या गुरूवारी जेलरोड येथील मंजुळा स्वीट दुकान परिसरात गेले होते. सायंकाळच्या सुमारास ते आपल्या दुचाकीवर घराकडे निघाले असता ही घटना घडली. दुचाकीवर बसत असतांना संशयीताने त्यांना हटकले यावेळी त्याने चेष्टामस्करीच्या रागातून चौधरी यांच्या डोळयात मिरची पुड फेकत बेदम मारहाण केली. या घटनेत चौधरी यांच्या हातावर फरशीचा तुकडा मारण्यात आल्याने ते जखमी झाले असून त्यांच्या दुचाकीचेही मोठे नुकसान करण्यात आले आहे. अधिक तपास पोलीस नाईक चव्हाण करीत आहेत.
शहरात आत्महत्येचे सत्र सुरूच
नाशिक : शहरात आत्महत्येचे सत्र सुरूच असून गुरूवारी (दि.१०) एका ६० वर्षीय वृध्दासह २५ वर्षीय तरूणाने आत्महत्या केली. दोघांच्याही आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. याप्रकरणी आडगाव आणि पंचवटी पोलीस ठाण्यात मृत्युची नोंद करण्यात आली आहे. माडसांगवी ता.जि.नाशिक येथील भगवान गंगाधर वाघ (६० रा.कॅनोल नं.७) या वृध्दाने गुरूवारी अज्ञात कारणातून मद्याच्या नशेत विषारी औषध सेवन केले होते. ही बाब निदर्शनास येताच कुटूंबियांनी त्यांना बिटको रूग्णालयात प्रथमोपचार करून अधिक उपचारार्थ जिल्हारूग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय सुत्रांनी मृत घोषीत केले. याप्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात मृत्युची नोंद करण्यात आली असून अधिक तपास हवालदार गायकवाड करीत आहेत. दुसरी घटना पंचवटीतील आयोध्यानगरी भागात घडली. सुखलेश उर्फ सचिन रमेश बागुल (२५ रा.सुतपुत्र सोसा.आयोध्यानगरी) या युवकाने गुरूवारी दुपारच्या सुमारास अज्ञात कारणातून आपल्या राहत्या घरातील पंख्यास दोरी बांधून गळफास लावून घेतला होता. त्यात त्याचा मृत्यू झाला. याबाबत भाऊ महेश बागुल यांनी दिलेल्या खबरीवरून पंचवटी पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास पोलीस नाईक लिलके करीत आहेत.