नाशिकरोड – कुरिअर डिलीवरी करणा-या महींद्रा पिकअप गाडीतून धुळे येथे पाठवण्यास ठेवलेले मोबाईल व स्मार्ट वॉच असलेले खाकी बॉक्स अज्ञात चोरट्याने आठ दिवसापूर्वी लंपास केले होते. या चोरांचा नाशिक रोड पोलिसांनी शोध घेऊन त्यांना गजाआड केले आहे. या चोरट्यांकडून पोलिसांनी २ लाख १४ हजाराचे ४० मोबाईल व ४ स्मार्ट वॉच जप्त केले आहे.
या बाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, , नाशिकरोड पोलीस ठाणेच्या हद्दीमध्ये ३ मार्च रोजी दुपारच्या सुमारास छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्या समोरील नाशिक -पुणे हायवे रोडवे पुलाखाली रोडवर कुरिअर डिलीवरी करणा-या महींद्रा पिकअप गाडीचे उघडया दरवाजातून धुळे येथे डिलीवरी साठी ठेवलेले मोबाईल व स्मार्ट वॉच असलेले खाकी बॉक्स अज्ञात चोरट्याने चोरी केले होते. याबाबत नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हे शोध पथकाचे पोलीस अधिकारी व अंमलदार हे मोबाईल चोरी करणारे गुन्हेगार यांचा शोध घेत असताना गुन्हे शोध पथकातील राजेश साबळे यांना गुप्त बातमीदारामार्फत खात्रीशिर माहीती मिळाली की, गुन्हयातील चोरी झालेला मुद्देमाल मोबाईल व स्मार्ट बॉच असलेले कुरिअरचे बॉक्स हे संशयीत शुभम दिपक कुम्हाडे राहणार जेलरोड नाशिकरोड याने चोरले आहेत. खात्रीशीर बातमी मिळाल्याने गुन्हे शोधपथकातील अधिकारी व अमलदार यांनी लागलीच सापळा रचून त्याचा शोध घेवून त्यास ताब्यात घेतले. त्यानंतर संशयीत आरोपीने गुन्हयाची कबुली दिली. अटक केलेल्या आरोपीकडून २ लाख १४ हजाराचे मोबाईल व स्मार्ट वॉच असलेले कुरीअरचे बॉक्स जप्त केले असून सदर गुन्हयाचा पुढील तपास राजेश साबळे व महेंद्र जाधव हे करीत आहे.