नाशिक: सुरक्षेची काळजी न घेतल्याने मजूर युवतीच्या मृत्युप्रकरणी बिल्डरवर गुन्हा दाखल
नाशिक – पाचव्या मजल्यावरुन पडून मजूर युवतीच्या मृत्युप्रकरणी बिल्डरवर गुन्हा दाखल झाला आहे. सुरक्षेची काळजी न घेतल्यामुळे बिल्डरवर ही कारवाई करण्यात आली आहे. राजेंद्र पंडीत सोनजे (वय ४५, वत्सल विहार, उंटवाडी ) असे बिल्डरचे नाव आहे. रुक्मीणी उर्फ कोमल पिराजी बोने (वय २१) मजूर युवती बांधकाम साईटवर पाणी मारण्याचे काम करीत असतांना पाचव्या मजल्यावरुन पडून तिचा मृत्यु झाला होता. पिराजी नारायण बोने (वय २९, निगळपार्क,ध्रुवनगर गंगापूर शिवार) यांच्या तक्रारीवरुन गंगापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी दिलेली माहीती अशी गंगापूर शिवारात ध्रुवनगर भागात आदीगुरु अपार्टमेंटच्या पश्चिमेला राजेंद्र पंडीत सोनजे यांच्या बांधकाम साईटचे कामकाज सुरु आहे. बांधकाम साईटवर कासोडा, वाळूंज ता.गंगापूर जिल्हा औरंगाबादयेथील मजूराची पत्नी असतांना मंगळवार (ता.८) सायंकाळी पावणे सहाच्या सुमारास बांधकाम साईटवर मजूरांच्या संरक्षणजाळी,बांबूचा पहाड किंवा भिंत बांधलेली नसल्याने किंवा मजूरांसाठी हेल्मेट, सेफ्टी बेल्टसह इतर कुठलेही संरक्षण साहित्य नसल्याने रुक्मीणी ही पाणी देत असतांना पाचव्या मजल्यावरुन पडून तिचा मृत्यु झाला. याप्रकरणी पती पिराजी बोनेच्या तक्रारीवरुन गंगापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
गळफास घेऊन आत्महत्या
नाशिक – गळफास घेऊन एकाने जेल रोडला पिंपळपट्टी मार्गावर मोरे मळ्यात आत्महत्या केली. उमेश अभिमान बागूल (वय २८, मोरे मळा) असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे. बुधवारी (ता.९) त्याने राहत्या घरात पंख्याला गळफास घेतल्याने त्याला उपचारासाठी बिटको रुग्णालयात दाखल केले असता डॉ. पाटील यांनी मृत घोषीत केले. याप्रकरणी नाशिक रोड पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे.