नाशिक : हिरावाडीत दुचाकीस्वारावर धारदार हत्याराने वार करण्यात आल्याची घटना घडली आहे. या हल्ल्यात दुचाकीस्वार जखमी झाला आहे. मारहाण करणा-यांनी अगोतर आवाज देत दुचाकीस्वाराला थांबवले. त्यानंतर टोळक्याने कुठलेही कारण नसतांना मारहाण केली. याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुसा व त्याचे तीन साथीदार अशी संशयीतांची नावे आहेत. याप्रकरणी राहूल रविंद्र कोटांगळे (२१ रा.वाघाडी,पंचवटी) या युवकाने तक्रार दाखल केली आहे. कोटांगळे रविवारी रात्री आपल्या दुचाकीवर प्रवास करीत असतांना ही घटना घडली. हिरावाडीतील भिकुसा मिल जवळील पाटावरून तो प्रवास करीत असतांना परिचीत मुसा याने त्यास आवाज देवून थांबविले. यावेळी टोळक्याने कुठलेही कारण नसतांना कोटांगळे यास लाथाबुक्यांनी बेदम मारहाण केली. त्यातील एकाने डोक्यावर काठी मारली तर दुस-याने धारदार हत्याराने खांद्यावर व हातावर वार केले. या घटनेत कोटांगळे जखमी झाला असून अधिक तपास हवालदार घुगे करीत आहेत.