नाशिक : पाथर्डी फाटा परिसरातील शिवसागर हॉटेलमधील किचन रुममधून चोरट्याने लंपास केले एक लाख रुपये
नाशिक : पाथर्डी फाटा परिसरातील शिवसागर हॉटेल मध्ये दुस-या मजल्यावरील किचन रूममध्ये शिरून चोरट्यांनी ड्राव्हरमधून एक लाखाची रोकड लंपास केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अमित अशोक गद्रे (रा.महात्मानगर) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. गद्रे यांचे पाथर्डी फाटा भागात शिवसागर नावाचे हॉटेल आहे. रविवारी रात्री अज्ञात चोरट्याने हॉटेलच्या दुस-या मजल्यावरील किचन उघडे असल्याची संधी साधत प्रवेश करून टेबलाच्या ड्राव्हर मध्ये ठेवलेली एक लाखाची रोकड चोरून नेली. अधिक तपास पोलीस नाईक गायकवाड करीत आहेत.
चोरट्यांनी लॅपटॉप केला लंपास
नाशिक : कान्हेरेवाडी कॉर्नर भागात पार्क केलेल्या कारची काच फोडून चोरट्यांनी लॅपटॉप लंपास केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी आशिष अरविंद शहा (रा.शिवमनगर,हिरावाडी) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली असून भद्रकाली पोलीस ठाण्यात तक्रारीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहा सोमवारी दुपारच्या सुमारास कामानिमित्त कान्हेरेवाडी कॉर्नर भागात गेले होते. रस्त्याच्या कडेला त्यांनी आपली कार एमएच १५ एफटी ०२७० पार्क केली असता अल्पावधीतच अज्ञात चोरट्यांनी कारची पाठीमागील दरवाजाची काच फोडून सिटावर ठेवलेली लॅपटॉप बॅग चोरून नेली. या बॅगेत २० हजार रूपये किमतीचा लॅपटॉप होता.
महिलेच्या हातातील मोबाईल दुचाकीस्वारांनी हिसकावून नेला
नाशिक : आयटीआय सिग्नल भागात फोनवर बोलत जाणा-या महिलेच्या हातातील मोबाईल दुचाकीस्वारांनी हिसकावून नेल्याची घटना घडली. अनिता हिंमत पाटील (रा.हनुमाननगर,आडगाव शिवार) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. पाटील या सोमवारी खुटवडनगर भागात गेल्या होत्या. सायंकाळच्या सुमारास त्या आयटीआय सिग्नलकडून आयटीआय पुलाच्या दिशेने मोबाईलवर बोलत पायी जात असतांना पाठीमागून आलेल्या एमएच १५ जीआर ९८७६ या पल्सरवरील दोघांपैकी एकाने त्यांच्या हातातील सुमारे १५ हजार रूपये किमतीचा मोबाईल हिसकावून नेला. याप्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात जबरीचोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक पठाण करीत आहेत.