नाशिक – मालेगावचे शिवाजी राजाराम हिवराळे हे दहीपुलावरून रामकुंडाकडे पायी जात असतांना त्यांच्यावर तीन जणांनी प्राणघातक हल्ला केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी पंचवटी पोलिसांनी तातडीने तपासाची सूत्रे हलवून दोघांना अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मालेगावमधील शिवाजी राजाराम हिवराळे हे कामानिमित्त नाशिकमध्ये आले होते. ते रविवारी सायंकाळी ६.३० वाजता दहीपुलावरून रामकुंडाकडे जात होते. यावेळी त्यांना तिघांनी हटकले. हिवराळे यांच्याकडील बॅग घेऊन झडती घेऊ लागले. त्यांना हिवराळे यांनी विरोध केला. बॅग घेऊन ते रामकुंडाच्या दिशेने निघाले असता तिघा संशयितांनी मागून येत दगड तसेच धारदार हत्याराने डोक्यावर वार केले. यात हिवराळे यांना गंभीर दुखापत झाली. या घटनेची पंचवटी पोलिसांना माहिती होताच तातडीने तपासाची सूत्रे हलवून पवन भगतराम खत्री (शनी चौक, पंचवटी), सागर नवनाथ पाटील यांना अटक केली तर तिसरा संशयित कार्तिक याचा शोध सुरु आहे. याप्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला आहे.