नाशिक – जळगाव जिल्ह्यातील भुसावळ येथे पाच जणांचा खून व तीन जणांना गंभीर जखमी करून तीन वर्षापासून पसार असलेल्या संशयित आरोपीला नाशिकरोड पोलिसांनी आज अटक केलीय. जळगाव जिल्ह्यातील भुसावळ येथे सन 2019 मध्ये ही घटना घडली होती. अरबाज अजगर खान उर्फ गोलु खान असे संशयीत आरोपीचे नाव आहे. नाशिक रोड गुन्हे शोध पथकाने त्याच्या मुसक्या आवळल्या. भुसावळ पोलीस ठाणे हद्दीतील समता नगर येथील जळगाव आरपीआय (आठवले गट) जिल्हाध्यक्ष तसेच भुसावळ नगर परिषदेतील भाजपाचे नगरसेवक रवींद्र बाबुराव खरात उर्फ हम्प्या दादा (रा.भुसावल, जि.जळगाव) व त्याच्या घरातील इतर ४ सदस्य असे एकुण ५ इसमाचा गोळ्या झाडून खुन केला करण्यात आला होता. तसेच इतर तीन जणांना गंभीर जखमी झाले होते.
शुक्रवारी नाशिकरोड पोलिस ठाण्यातील गुन्हे शोध पथकाचे कर्मचारी पोलीस हवालदार अनिल शिंदे, विशाल पाटील,विष्णू गोसावी, मनोहर शिंदे, राकेश बोडके,सोमनाथ जाधव, कुंदन राठोड, केतन कोकाटे, सागर आडणे हे जेलरोड पाण्याची टाकी परिसरात गस्त घालीत असतांना कर्मचारी मनोहर शिंदे यांना गुप्त बतमीदारकडून माहिती मिळाली होती की, भुसावळ पोलिसांकडील गुन्हा रजि.२२२/२०१९ मधील प्रमुख संशयित अरबाज अजगर खान ऊर्फ गोलू खान हा संशयित जेलरोड परिसरात फिरत आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शिंदे यांना माहिती देत वरिष्ठच्या मार्गदर्शनाखाली सेंट्रल जेल परिसरात सापळा लावला. तेव्हा गोलू खान पळून जात असतांना पोलिसांनी त्यास मोठ्या शिताफीने ताब्यात घेतले. नाशिकरोड पोलिसांनी कायदेशीर सोपस्कार उरकून त्यास पुढील चौकशीकामी सीआयडीच्या ताब्यात दिले.
दरम्यान सदरची कामगिरी पोलीस आयुक्त दीपक पाण्डेय, पोलीस उपायुक्त विजय खरात, सहाय्यक पोलीस आयुक्त डॉ सिद्धेश्वर धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शिंदे, पोलीस निरीक्षक गणेश न्याहदे, पोलीस निरीक्षक राजू पाचोरकर, सहाय्यक पोलिस निरीक्षक योगेश पाटील, पोलीस उपनिरीक्षक जयेश गांगुर्डे व गुन्हे शोध पथकातील पोलीस कर्मचारी यांनी पार पाडली.
यांचा झाला होता खून
६ आॅक्टोबर २०१९ रोजी रात्री ९.३० वाजेच्या सुमारास भाजपाचे तत्कालीन नगरसेवक रवींद्र बाबूराव खरात उर्फ हम्प्या, त्यांचा भाऊ सुनील बाबूराव खरात, मुलगा सागर व रोहित रवींद्र खरात आणि सुमित गजरे या पाच लोकांचे हत्याकांड घडून आणण्यात आले होते.ही घटना जिल्ह्यात नव्हे तर राज्याला हादरवून सोडणारी होती. घटना घडल्यानंतर केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, माजी मंत्री एकनाथराव खडसे, तत्कालीन पालक मंत्री गिरीश महाजन यांच्यासह इतर लोकप्रतिनिधींनी भेट दिली होती तर तत्कालिन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घटनेसंदर्भात विश्वासू मंत्री व पोलिस अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली होती. आठवले हे तर अंत्ययात्रेत ही सहभागी झाले होते. दरम्यान आरोपीच्या अटकेच्या वृत्ताला जळगाव पोलिसांनी दुजोरा दिला आहे.