नाशिक – शिर्डी – मुंबई प्रवासात साई भक्तांची लुटमार करणा-या टोळीला पोलिसांनी गजाआड केले आहे. स्थानिक गुन्हे शाखेने ही कारवाई केली आहे. या लुटमार प्रकरणात शिर्डी येथे राहणारा साहील रामलाल गुप्ता, पारुल सुनिल बंसल या दोघांना अटक केली आहे
याबाबत स्थानिक गुन्हे शाखेने दिलेली माहिती अशी की, २८ फेब्रुवारी रोजी रात्री ९ वाजता शिर्डी येथून दिल्ली येथील एक महिला व एक पुरुष प्रवासी हे तवेरा गाडीत मुंबई विमानतळ येथे जाण्यासाठी निघाले होते. तेव्हा तवेरा गाडीत इतर चार प्रवाशी होते. सदरची तवेरा गाडी ही प्रवाशांना घेऊन सिन्नर घोटी रोडने घोरवड घाटातून जात असतांना रात्री १२ वाजेच्या सुमारास गाडीत बसलेल्या चार इसमांनी दिल्ली येथील पुरुष व महिला यांना दमबाजी करुन त्यांचेकडील किंमती मोबाईल व त्यांचेकडील बॅगा या काढून घेतले व त्यांना घोरवड घाटात उतरवून दिले होते. सदर प्रकाराची माहिती मिळताच स्थानिक गुन्हेशाखेकडील पथकाने घटनास्थळी धाव घेऊन दिल्ली येथील साईभक्त प्रवाशांची भेट घेऊन त्यांचेकडून सदरचे आरोपींबाबत माहिती प्राप्त करुन तात्काळ तपास सुरु केला.
पोलीस निरीक्षक हेमंत पाटील, स्थानिक गुन्हे शाखा यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, दिल्ली येथील साईभक्त प्रवाशांची लुटमार करणारे आरोपी हे सिन्नर शिर्डी रोडने वावी परीसरातून तवेरा गाडीने जाणार आहे. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेकडील पोलीस पथकांनी वावी परीसरात सापळा रचून शिर्डी बाजुकडून वावी बाजुकडे येणारे विना क्रमांकाचे सफेद रंगाचे तवेरा गाडीचा पाठलाग करुन पकडले. तेव्हा सदरचे गाडीत दोन इसम मिळून आल्याने त्यांचेकडे सखोल चौकशी केली. त्यांनी सुरुवातीला उडवाउडवीचे उत्तरे दिली. परंतु, पोलीसी खाक्या दाखविताच त्यांनी दिल्ली येथील प्रवाशांची घोरवड घाट येथे लुटमार केल्याची कबुली दिली. त्यांचे गाडीची झडती घेतली असता दिल्ली येथील प्रवाशांचे काढून घेतलेले मोबाईल व बॅगा मिळून आल्याने त्यांना पुढील चौकशीकामी सिन्नर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.