नाशिक : नाशिक शहरातील जेलरोड भागात मुख्याध्यापकाने दहावीच्या विद्यार्थ्यांना बेदम मारहाण केल्याने पालकांमध्ये खळबळ उडाली आहे. एक साधी काच फुटली म्हणून मुख्याध्यापकाने शाळेतील जवळपास सहा ते सात विद्यार्थ्यांना मारल्याचे बोलले जात आहे. या बेदम मारहाणीमुळे विद्यार्थ्यांच्या दंडावर, छातीवर वळ उठले. यशराज ढिकले या विद्यार्थ्याला जास्त मार लागला आहे. या मारहाणीबरोबरच मुख्याध्यापकाने पाच हजारांची मागणी विद्यार्थ्याकंडे केली आहे.
या घटनेमुळे पालक संतप्त झाले असून त्यांनी मुख्याध्यापकांवर कारवाई करावी अशी मागणी केली आहे. या प्रकरणी कुठे तक्रार कराल, पोलिसात जाल, तर तुमचे दहावीचे वर्ष बर्बाद करू, अशी धमकीही या मुख्याध्यपकांनी विद्यार्थ्यांना दिली आहे. पण, मारहाण झालेल्या एका विद्यार्थ्याने पोलिसात धाव घेतली आहे. मात्र, दुसऱ्या विद्यार्थ्यांचे पालक आपल्या मुलाचे वर्ष वाया जाईल म्हणून तक्रार देण्यासाठी घाबरत आहे.