नाशिक : दुचाकीवर आलेल्या चोरांनी दोन महिलांच्या गळयातील मंगळसूत्र ओरबाडून नेल्याच्या दोन घटना शहरातील वेगवेगळ्या भागात घडल्या आहे. याप्रकरणी आडगाव आणि नाशिकरोड पोलीस ठाण्यात जबरीचोरीचे गुन्हे दाखल झाले आहेत. धात्रकफाटा येथील वर्षा विजय पाटील (४० रा.रेशमाई निवास,मयुरेश अपा.) या सोमवारी परिसरातील राऊत मळा भागात फेरफटका मारण्यासाठी गेल्या होत्या. दुपारच्या सुमारास त्या आपल्या घराकडे परतत असतांना ही घटना घडली. साईराम रो हाऊस समोरून त्या पायी जात असतांना पाठीमागून डबलसिट आलेल्या दुचाकीस्वारांपैकी एकाने त्यांच्या गळयातील सुमारे १५ हजार रूपये किमतीचे मंगळसुत्र ओरबाडून नेले. याप्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात जबरीचोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास उपनिरीक्षक पाथरे करीत आहेत. दुसरी घटना जुना मालधक्का रोड भागात घडली. खर्जुल मळा परिसरातील प्रियंका किरण खर्जुल (रा.हौसानंद बंगला,खर्जुल मळा) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. खर्जुल या सोमवारी सायंकाळच्या सुमारास परिसरात फेरफटका मारीत असतांना ही घटना घडली. हरी संस्कृती सोसायटी जवळून त्या पायी जात असतांना समोरून आलेल्या दुचाकीस्वारांपैकी एकाने त्यांच्या गळय़ातील सुमारे ६० हजार रूपये किमतीची सोन्याची शॉट पोत ओरबाडून पोबारा केला. याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात जबरीचोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास हवालदार उजागरे करीत आहेत.