नाशिक – युवकास आत्महत्येस प्रवृत्त करून त्याच्या आत्महत्येची खबर न देता मृतदेह मोकळ्या जागी फेकून दिल्याप्रकरणी आडगाव पोलिसांनी महिलेसह दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. रमेश रविंद्र मोरे (वय २५) असे मृत युवकाचे नाव आहे. राजु लक्ष्मण मोरे (वय ३९, रा. कंडारी गाव, कोळीवाडा, भुसावळ) यांनी याप्रकरणी तक्रार दिली आहे. या तक्रारीत म्हटले आहे की, छाया गांगुर्डे हिने फिर्यादीचा पुतण्या रमेश मोरे याने गावाकडे लग्न करू नये म्हणून त्यास वेळोवेळी मानसिक त्रास देऊन आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले. रमेशने आत्महत्या केल्यानंतर त्याबाबत पोलिसांना खबर न देता पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह ओझर येथील घरातून काढून मोटारसायकलवर आडगाव शिवारात आणला. मुंबई-आग्रा महामार्गावरील ९ वा मैल येथील पाटील पेट्रोल पंपाजवळील मोकळ्या जागेत फेकला. या तक्रारीवरुन छाया गांगुर्डे (वय ४५, रा. ओझर, ता. निफाड) हिच्यासह एका अनोळखी संशयिताविरुद्ध भादंवि कायदा कलम ३०६, २०१, १७६, ३४ अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे.