नाशिक – साडेसतरा लाख रुपये किमतीच्या सोन्याचांदीच्या दागिन्यांचा अपहार करणार्या दाम्पत्याविरुद्ध आडगाव पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे दागिने नवीन व दुरुस्तीसाठी विश्वासाने दिले होते. पण, त्याचा अपहार करण्यात आल्यामुळे हा प्रकार पोलिस स्थानकात पोहचला. या फसवणूक प्रकरणी सतीश गोपाळ कुलकर्णी (वय ७०, रा. कर्मयोगीनगर, धात्रक फाटा, नाशिक) यांनी तक्रार दिली आहे. संदीप रणधीर, प्रियंका रणधीर (दोघेही रा. धात्रक फाटा) यांच्याकडे १७ लाख ६० हजार रुपये किमतीचे ८८ तोळे सोन्याचे दागिने व ४७ ग्रॅम चांदीचे दागिने नवीन करण्यासाठी व दुरुस्ती करण्यासाठी विश्वासाने त्यांच्याकडे सोपविले होते. मात्र रणधीर दाम्पत्याने हे दागिने स्वत:कडे ठेवून ते दुरुस्त न करता त्याचा अपहार करून स्वत:च्या फायद्यासाठी वापर करून कुलकर्णी यांची फसवणूक केली. दरम्यान हा प्रकार १ जुलै २०२१ ते २७ फेब्रुवारी २०२२ या दरम्यानच्या कालावधीत घडला. कुलकर्णी यांनी या दागिन्यांबाबत वेळोवेळी चौकशी केली. मात्र रणधीर यांनी दागिने परत देण्यास नकार दिला. अखेर आडगाव पोलीस ठाण्यात संदीप रणधीर व प्रियंका रणधीर यांच्याविरुद्ध भा. दं. वि. कलम ४२०, ४०६, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक जाधव करीत आहेत.