नाशिक – दुचाकी, रोटाव्हेटर आणि महागडया एलईडी चोरट्यांना चार जणांना पोलिसांनी गजाआड केले आहे. या चारी आरोपींकडून अनेक मोठे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. अटक करण्यात आलेल्यामध्ये राजेश रामशंकर शर्मा (रा नीमच, मध्यप्रदेश), राकेश संसारे (रा. मनमाड नाशिक), श्रीराम सोनवणे (रा. वाकला ता वैजापूर), अनिल सुकदेव डांगे (रा लोणी खुर्द ता. वैजापूर) यांचा समावेश आहे. या संशयितांना ताब्यात घेतल्यानंतर त्यांनी सुरुवातीला उडवा उडवीची उत्तरे दिली. यानंतर त्यांना पोलिसी खाक्या दाखवल्यानंतर त्यांनी गुन्हा केल्याची कबुली दिली. यामध्ये सटाणा, मनमाड येथे ८ रोटाव्हेटर विक्री केल्याची कबुली दिली. तसेच औरंगाबाद वैजापूर , शूर बंगला व वीरगाव येथून शोरूम व घरासमोरून चोरलेल्या नऊ दुचाकी वाहनांची चोरी केली. या माहितीच्या आधारे ९ दुचाकी, ८ रोटाव्हेटर व एक ४२ इंचाचा एलईडी टीव्ही ताब्यात घेण्यात आले आहेत. या आरोपींनी नाशिक व औरंगाबाद जिल्ह्यात घरफोड्या व चोऱ्या केल्याची कबुली दिली आहे. यासोबतच राजेश रामशंकर शर्मा हा सराईत गुन्हेगार असून त्याच्याविरोधात नाशिक शहरातील विविध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या संशयितांकडून ८ लाख ९१ हजार ४४३ रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. या आरोपींवर सटाणा, मालेगाव कॅम्प व मनमाड पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत.
असे सापडले चोर
काही दुचाकी चोर व घरफोडीतील संशयित आरोपींची गुप्त माहिती पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांना मिळाली होती. यानंतर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांनी पथके नेमली. त्यानुसार या आरोपींच्या अटकेसाठी पथके रवाना करण्यात आली होती. यानंतर मनमाड , वैजापूर परिसरात सापळा रचला. यानंतर या चोरांना मनमाड येथे अटक करण्यात आली आहे.