नाशिक – वडनेर गेट भागात सोनकर इन्फा कंपनीचे दोघा परप्रांतीय कामगारांनी पाच लाख रूपये किमतीचे मशिन चोरून नेल्याचा प्रकार घडला. अंडरग्राऊंड गॅस पाईप लाईन टाकण्याच्या कामात मदतनीस म्हणून हे दोघे काम करत होते. याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राकेशकुमार व सुधीर नारायण राय (रा. भगवतपूर, समस्तीपूर बिहार) अशी संशयीतांची नावे आहेत. याप्रकरणी मनिषकुमार सिंग (रा.वडनेरगेट) यांनी तक्रार दाखल केली आहे. सिंग हे सोनकर इन्फा कंपनीत प्रोजेक्ट व्यवस्थापक आहेत. एमएजी ५ लोकॅटींग सिस्टीम मशिन ऑपरेटर म्हणून दीपक वंशकार काम बघतात. गेल्या रविवारी (दि.१३) वडनेर गेट परिसरातील साईटवर काम सुरू असतांना ऑपरेटरला मदतनीस म्हणून काम बघणा-या दोघा संशयीतांनी सुमारे पाच लाख रूपये किमतीचे एमएजी ५ लोकॅटींग सिस्टीम मशिन चोरून नेले. मशिनसह दोघे संशयीत पसार झाल्याने हा प्रकार समोर आला असून अधिक तपास हवालदार सातभाई करीत आहेत.