नाशिक : सिडकोतील प्रसादनगर भागात हळदीचा कार्यक्रम आटोपून घराकडे परतणा-या दोन मैत्रीणींपैकी एकीच्या गळयातील मंगळसूत्र दुचाकीस्वारांनी ओरबाडून नेल्याची घटना घडली. नगरसेविका प्रतिभा पवार यांच्या घरासमोरून त्या पायी जात असतांना स्कुटीवरून आलेल्या भामट्यांनी त्यांच्या गळयातील सुमारे २ लाख ४० हजार रूपये किमतीचे मंगळसुत्र ओरबाडून पोबारा केला. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात जबरीचोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पल्लवी दिलीप पगार (रा.मधुबन अपा.बुरकुले हॉल जवळ) यांनी तक्रार दाखल केली आहे. पगार या मैत्रीण आशा पगार यांच्या समवेत गुरूवारी रात्री परिसरातच हळदीच्या कार्यक्रमासाठी गेल्या होत्या. रात्री हळद आटोपून दोघी मैत्रीणी आपल्या घराकडे परतत असतांना ही घटना घडली. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक निलेश राजपूत करीत आहेत.