नाशिक : बनावट दस्तऐवज तयार करून जमिन परस्पर विक्री करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणीत नोटरी करणा-या वकिलासह सहा जणांविरूध्द देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. न्यायालयाच्या आदेशाने ही कारवाई करण्यात आली आहे. नाजीम अब्दूल मजीद शेख,तब्बसुम इरफान शेख,अब्दूल मजीद शेख (रा.संसरीनाका,दे.कॅम्प),रमेश जाधव,तुकाराम मोरे व अॅड.ए.आय.शेख (रा.नाशिकरोड) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयीतांची नावे आहेत. याप्रकरणी मुंबईस्थित इरफान अब्दूलगनी शेख (मुळ रा.देवळाली कॅम्प) यांनी तक्रार दाखल केली आहे. इरफान शेख यांच्या मालकिची मौजे लहवित येथील सर्व्हे नं १४८ /१/२ मध्ये सेत जमिन आहे. या मिळकतीचे संशयीतांनी कट रचून परस्पर विक्री करण्याच्या इराद्याने बनावट दस्तऐवज तयार केले. त्यानंतर या दस्तऐवजावर अॅड. ए.आय.शेख यांनी नोटरी केल्याचे म्हटले आहे. याप्रकरणानंतर इरफान शेख हे पोलिस स्थानकात गेले. पण, येथे त्यांना न्याय न मिळाल्याने त्यांनी कोर्टात धाव घेतली होती. न्यायालयाने संबधीतांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले असून उपनगर पोलीस ठाण्यात फसवणुकीसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अधिक तपास सहाय्यक निरीक्षक गिते करीत आहेत.