नाशिक – शहरात राजरोसपणे वावरणाऱ्या तडीपारास पोलिसांनी केले गजाआड
नाशिक : गुन्हेगारी कारवायांमुळे पोलीसांनी हद्दपारीची कारवाई केलेली असतांना शहरात राजरोसपणे वावरणाऱ्या तडीपारास पोलिसांनी अटक केली. ही कारवाई रोकडोबावाडी येथील आण्णा गणपती पुलाच्या भिंतीलगत करण्यात आली. या प्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. नितीन निवृत्ती बनकर (२७ रा.रोकडोबावाडी नाशिकरोड) असे अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे. सततच्या गुन्हेगारी कृत्यांमुळे त्यास शहर पोलीसांनी चार महिन्यांसाठी शहर आणि जिह्यातून हद्दपार केले. मात्र त्याचा वावर शहरातच असल्याची माहिती पोलीसांना मिळाली होती. सोमवारी (दि.२१) दुपारच्या सुमारास तो रोकडोबावाडी येथील आण्णा गणपती पुल परिसरात असल्याची माहिती पोलीसांना मिळाली त्यानुसार पुलाच्या भिंतीलगत सापळा लावून त्यास जेरबंद करण्यात आले. या प्रकरणी उपनगरचे पोलीस ठाण्याचे कर्मचारी सुरज गवळी यांनी दिलेल्या तक्रारीवरून गुह्याची नोंद करण्यात आली. अधिक तपास पोलीस नाईक विनोद लखन करीत आहेत.
जुगार खेळणाऱ्या तिघांना पोलीसांनी केली अटक
नाशिक : बिडीकामगारनगर भागात जुगार खेळणाऱ्या तिघांना पोलीसांनी अटक केली. रोकड व जुगाराचे साहित्य असा सुमारे अडिच हजाराचा मुद्देमाल आरोपींच्या ताब्यातून हस्तगत करण्यात आला. पोलिसांची चाहूल लागताच काही जुगारी फरार झाले. त्यांचा शोध घेतला जात आहे. या प्रकरणी आडगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शेख युनूस शेख गुलाब (५६), गोरख आनंदा धात्रक (४१ रा. दोघे दत्तमंदिरासमोर,सावित्रीबाई झोपडपट्टी) आणि राजू अमोल सिंग (२८ रा.निलगीरीबाग,औरंगाबादरोड) अशी संशयीतांची नावे आहेत. सावित्रीबाई झोपडपट्टीत जुगार अड्डा सुरू असल्याची माहिती पोलीसांना मिळाली होती. त्यानुसार सोमवारी (दि.२१) सायंकाळच्या सुमारास आडगाव पोलीसांनी छापा टाकला. यात हे तीन जुगारी पोलीसांच्या हाती लागली. पत्यांच्या कॅटवर पैसे लावून अंदर बाहर नावाचा जुगार खेळतांना व खेळवितांना संशयित मिळून आले. त्यांच्या ताब्यातून २ हजार ७७० रूपयांची रोकड व जुगाराचे साहित्य हस्तगत करण्यात आले. या प्रकरणी पोलीस शिपाई देवानंद मोरे यांनी दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून, अधिक तपास पोलीस नाईक सूर्यवंशी करीत आहेत.