नाशिक – कपडे विक्रेत्याच्या गल्ल्यात हात टाकून बळजबरीने बाराशे रुपये काढून नेणाऱ्या भाईला उपनगर पोलिसांनी गजाआड केले आहे. अवघ्या दोन तासात या कथित भाईचा शोध घेऊन पोलिसांनी ही कारवाई केली.
याप्रकरणी उपनगर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला. या घटनेची माहिती होताच, पोलिस उपायुक्त विजय खरात, सहायक आयुक्त सिद्धेश्वर धुमाळ यांनी तातडीने कारवाई करण्याचे आदेश उपनगर पोलिसांना केले. यानुसार वरीष्ठ पोलिस निरीक्षक निलेश माईनकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक ए.बी. पाटील, गुन्हे शोध पथकाचे अंमलदार लखन, गवळी, कर्पे, घुगरे यांनी घोड्या भाईचा माग काढण्यास सुरुवात केली व त्याला गजाआड केले.
घोड्या भाईची अशी दादागिरी
‘तुम मुझे पहचानते नही, मुझे घोड्या भाई बोलते है’, असे म्हणून त्याने हे पैसे गल्यातून काढून घेतले होते. हा घोड्या भाई म्हणजे सराईत गुन्हेगार सचिन मधुकर तोरवणे आहे. तो रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. उपनगर पोलिसांच्या हद्दीत मिराज मन्सूर खान यांचे कपडे विक्रीचे दुकान आहे. घोड्या भाईने तिथे जाऊन कपडे पहाण्याचा बहाणा करताना मिराज खानला चापटीने मारहाण केली. ‘तुम मुझे पहचानते नही, मुझे घोड्या भाई बोलते है’, असे दरडावत त्याने दुकानाच्या गल्ल्यात हात टाकला व जबरीने १२०० रुपये काढून नेले.
अवघ्या दोन तासात भाई पोलिसांच्या हाती
अवघ्या दोन तासात हा भाई पोलिसांच्या हाती लागला. त्याच्या अंगझडतीत ९३० रुपये मिळून आले. त्याच्याविरुद्ध भादंवि कायदा कलम ३९२ नोंदविण्यात आला असून त्यास अटक करण्यात आली आहे.