नाशिक – अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्यास न्यायालयाने तीन वर्षे सक्तमजूरची शिक्षा सुनावली आहे. शिक्षेबरोबरच दोन हजार रुपयांचा दंडही ठोठावला आहे. भुषण निवृत्ती घुमरे (२९) असे विनयभंग करणाऱ्या आरोपीचे नाव आहे. फेब्रुवारी २०१८ मध्ये सिडकोतील ओमकार चौक परिसरात भाडेतत्वावर राहणाऱ्या भुषण घुमरे याने पीडितेचा विनयभंग केला होता. सायंकाळच्या सुमारास पीडित मुलगी साडी घालण्यासाठी भुषण यांच्या पत्नीकडे आली होती. पत्नी घरात नसतानाही भुषणने तिला खोटे बोलून घरात घेतले. त्यानंतर भुषणने पीडितेचा विनयभंग केला. याप्रकरणी अंबड पोलिस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला. तत्कालीन वरिष्ठ पोलिस निरीक्षक मधुकर कड यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक पी. आर. निमसे यांनी तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. सरकारी पक्षातर्फे ॲड. दिपशिखा भिडे यांनी युक्तीवाद करीत तीन साक्षीदार तपासले. आरोपीविरोधात गुन्हा शाबित झाल्याने न्यायाधीश डी. डी. देशमुख यांनी भुषणला तीन वर्षे कारावास व दोन हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे.