नाशिक – खोडदेनगर भागात जुना वाद मिटवायचा आहे असे म्हणून तरूणास बेदम मारहाण करीत त्रिकुटाने त्याची दुचाकी पेटवून दिल्याची घटना घडली. याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेत दुचाकीचे मोठे नुकसान झाले आहे. दीपक उर्फ डेमो जाधव, कल्पेश उर्फ बिट्टया मकवाना व भुषण खांडेकर अशी संशयितांची नावे आहेत. याप्रकरणी शुभम पुनम झांजोटे (२१,रा. नारायणबापूनगर) या युवकाने तक्रार दाखल केली आहे. झांजोटे शुक्रवारी नेहमीप्रमाणे आपल्या दुचाकीवर चक्कर मारण्यासाठी घराबाहेर पडले होते. खोडदेनगर येथील सार्वजनिक शौचाल्याजवळून ते पल्सर या दुचाकीवर आपल्या घराकडे जात असतांना ही घटना घडली. शौचालयाजवळ थांबलेल्या त्रिकुटाने दुचाकीस्वार तरूणाची वाट अडवित मागील भांडण मिटवायचे आहे असे म्हणून वाद घातला. यावेळी संतप्त त्रिकुटाने त्यास शिवीगाळ करीत लाथाबुक्यांनी मारहाण केली. याप्रसंगी संशयीतापैकी एकाने झांजोटे यांच्या दुचाकीवर ज्वलनशील पदार्थ टाकून पेटवून दिली. या घटनेत दुचाकीचे मोठे नुकसान झाले असून अधिक तपास हवालदार शेजवळ करीत आहेत.