नाशिक – सासरच्या मंडळीकडून विवाहितेचा छळ केल्या प्रकरणी सहा जणांविरूध्द गुन्हा दाखल
नाशिक – सासरच्या मंडळीकडून विवाहितेचा मानसिक व शारिरीक छळ केल्या प्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात इगतपुरी तालुक्यातील पिंपळगाव डुकरा येथील सहा जणांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. योगेश जाधव, सासू विमलबाई, सासरे जगन्नाथ, दीर प्रवीण यांच्यासह दोन्ही नणंद अशी संशयीतांची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार २८ वर्षीय विवाहीतेने तक्रार दाखल केली आहे. महिलेचा सन.२०१० मध्ये पिंपळगाव डुकरा (ता. इगतपुरी) येथील योगेश जाधव याच्याशी विवाह झाला आहे. जून २०१० ते २०१६ दरम्यान सातपूरला राहत असतांना विवाहितेला मुलगी झाल्याच्या रागातून तिच्या सासरच्या मंडळीकडून शारीरीक व मानसिक त्रास दिला गेला. अधिक तपास हवालदार मुसळे करीत आहेत.
लॅमरोडवरील विहीतगाव येथे तडीपारास पोलीसांनी ठोकल्या बेड्या
नाशिक : लॅमरोडवरील विहीतगाव येथे तडीपारास पोलीसांनी बेड्या ठोकल्या आहे. याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रशांत अशोक बागुल (२६ रा.बागुलनगर,विहीतगाव) असे अटक करण्यात आलेल्या तडीपाराचे नाव आहे. बागुल याच्या गुन्हेगारी कारवायांमुळे त्यास शहर पोलीसांनी सहा महिन्यांसाठी शहर आणि जिह्यातून हद्दपार केले आहे. मात्र त्याचा वावर शहरातच असल्याची माहिती पोलीसांना मिळाली होती. पोलीस त्याच्या मागावर असतांनाच शनिवारी (दि.१९) दुपारच्या सुमारास तो लॅमरोड भागात असल्याची माहिती पोलीसांना मिळाली त्यानुसार विहीतगाव येथील बुध्दविहारच्या भिंतीलगत सापळा लावून त्यास जेरबंद करण्यात आले. याप्रकरणी उपनगरचे पोलीस शिपाई भुषण अनवट यांनी दिलेल्या तक्रारीवरून गुह्याची नोंद करण्यात आली असून अधिक तपास जमादार गोडसे करीत आहेत.