नाशिक : लष्करी हद्दीत नियमीत रनिंग करीत असतांना पडल्याने लष्कराच्या जवानाचा मृत्यु
नाशिक : लष्करी हद्दीत नियमीत रनिंग करीत असतांना पडल्याने लष्कराच्या एका जवानाचा मृत्यु झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात मृत्युची नोंद करण्यात आली आहे. हिमांशू शेखर जाना (३७) असे मृत जवानाचे नाव आहे. जाना हे लष्करात हवालदार पदावर कार्यरत होते. शनिवारी (दि.१९) सकाळी ते लष्करी हद्दीत पळण्याचा नियमीत सराव करीत असतांना ही घटना घडली. पळत असतांना अचानक पडल्याने त्यांना औषधोपचारासाठी मिलट्री हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले असता उपचार सुरू असतांना त्याचा मृत्यु झाला. याप्रकरणी मेजर डॉ. विकास कुमार यांनी दिलेल्या खबरीवरून पोलीस दप्तरी नोंद करण्यात आली असून अधिक तपास हवालदार ठाकरे करीत आहेत.
घरफोडीच्या संशयावरुन एकास अटक
नाशिक – घरफोडीच्या संशयावरुन म्हसरुळ शिवारातील जैन मंदीर परिसरात गस्तीपथकाने एकास जेरबंद केले. याप्रकरणी म्हसरूळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रतीक भालचंद्र सुर्यवंशी (२८, रा.सुर्यंवशी मळा,वरवंडी रोड) असे अटक केलेल्या संशयितांचे नाव आहे. शनिवारी (दि.१९) मध्यरात्री सव्वा दोनच्या सुमारास गस्ती पथक म्हसरुळ येथील जैन मंदीरासमोरील मोकळ्या पटांगणात गस्त घालत होते. यावेळी संशयित संशयास्पद फिरतांना मिळून आला. पोलिस शिपाई प्रशांत देवरे यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली असून अधिक तपास पोलीस नाईक चव्हाण करीत आहेत.