नाशिक : – वडिलोपार्जीत मालमत्ता परस्पर विक्री केल्याप्रकरणी न्यायालयाच्या आदेशाने सरकारवाडा पोलीस ठाण्यात खरेदी आणि विक्री करणा-या सात जणांविरूध्द सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या मिळकतीत अविभक्त हिस्सा असलेल्या महिलेने न्यायालयात धाव घेतल्याने ही कारवाई करण्यात आली आहे. याप्रकरणी शैलजा माधव ओक (७० रा.सर्कल टावर,अशोकस्तंभ) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली असून शिवांगी विश्वनाथ पेठे (७०),चंद्रशेखर विश्वनाथ पेठे (४२ रा.दघे इंद्रायणी लॉन्स जवळ,औरंगाबादरोड),राहूल विश्वनाथ पेठे (३९ रा.बालेवाडी,पुणे), राजाराम मुरलीधर फडोळ (७३),किसन राजाराम फडोळ (४७),दत्तात्रेय मुरलीधर फडोळ (६३),शिवाजी दत्तात्रेय फडोळ (रा.चौघे मुंगसरे ता.जि.नाशिक) अशी संशयीतांची नावे आहेत.
पेठे कुटूंबिय आणि तक्रारदार ओक या एकमेकांचे नातेवाईक आहेत. संबधीतांची जलालपूर येथील गट नं.११ क्षेत्र १० हेक्टर ३३ आर आणि मुंगसरे शिवारात गट नं.१० क्षेत्र ८ हेक्टर ६६ आर शेतजमिन वडिलोपार्जीत आहे. या जमिनीवर ओक यांचा अविभक्त हिस्सा असतांना पेठे कुटूंबियांनी ओक यांना कल्पना न देता बनावट कागदपत्राच्या आधारे परस्पर फडोळ कुटूंबियांना विक्री केली. याबाबत दुय्यम निबंधक कार्यालयात १६ मार्च २०१५ रोजी खरेदीखत करण्यात आले. याबाबत माहिती मिळताच ओक यांनी पोलीसांकडे धाव घेतली. पण, येथे दखल न घेतल्यामुळे त्या कोर्टात गेल्या. न्यायालयाने संबधीतांवर फसवणुकीसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. त्यानंतर सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुह्याची नोंद करण्यात आली आहे. अधिक तपास उपनिरीक्षक बस्ते करीत आहेत.